तेल गेले, तूप गेले हाती धुपाटणे आले

jahar
चीनमधील एका महिलेला अगदीच विचित्र परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ आली. आत्महत्या करण्याचा तिचा प्रयत्न साफ फसला आणि पोलिसांचे लचांडे मात्र तिच्या मागे लागले.

झाले असे की ही महिला जीवनाला अगदी कंटाळली होती. मग तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी घरातच असलेले किटकनाशक वापरण्याचे ठरवून ती हे किटकनाशक प्यायली आणि आता आपण मरणार म्हणून प्रतीक्षा करत राहिली. पण तास उलटले तरी ती ठणठणीतच. मग तिला जो काही राग आला की तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याच तिरमिरीत तिने किटकनाशक खरेदी केलेल्या दुकानात हजेरी लावून जाब विचारला तेव्हा किटकनाशकात भेसळ असल्याचे उघड झाले.

या महिलेने तातडीने पोलिस स्टेशन गाठून दुकानदार व किटकनाशक कंपनीविरोधात भेसळ केल्याची तक्रार केली. पोलिसांनी तक्रार नोदवून घेतलीही पण त्याचबरोबर महिलेने आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला म्हणून तिच्याविरोधातही गुन्हा नोंदविला. त्यामुळे आत्महत्त्या राहिली, किटकनाशक संपले आणि तिच्या पदरी पोलिस कोठडी मात्र आली.

Leave a Comment