कुर्दिश फौजांना जर्मनी देणार शस्त्रास्त्रे

iraq
अशांत भागात शस्त्रे निर्यात न करण्याचा दीर्घकाळच्या नितीत जर्मनीने आता बदल केला असून इराक व सिरीयात इस्लामिक स्टेटच्या क्रूर दहशतवाद्यांशी लढा देत असलेल्या कुर्दिश फौजांना पुरेसे लष्करी सहाय्य देण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे. ही मदत कशा स्वरूपाची असेल याचा निर्णय या आठवड्यात घेतला जाणार आहे.

जर्मनीचे परराष्ट्रमंत्री फ्रँक वॉल्टर स्टेनमेअर या संदर्भात म्हणाले की कुर्दिश फौजांना क्रूर इस्लामिक दहशतवाद्यांपासून स्वतःचे संरक्षण करता येईल अशी शस्त्रे आम्ही देणार आहोत. या विषयी अनेक आठवडे चर्चा सुरू आहे. त्या संदर्भात जर्मनीच्या चॅन्सलर मर्केल आणि त्यांच्या मंत्रीमंडळाशी चर्चा झाली आहे. तसेच युरोपियन युनियनच्या सदस्य देशांना कुर्दिश फौजांना शस्त्रपुरवठा करण्याची परवानगी देण्यासंबंधीचा करारही ब्रुसेल्स येथे नुकताच करण्यात आला आहे. ब्रिटन, फ्रान्स आणि इटलीने यापूर्वीच शस्त्रपुरवठा सुरू केला आहे आणि आम्हीही आता तोच निर्णय घेतला आहे.

इराक सिरीयातील यहुदी, ख्रिश्चन आणि अन्य अल्पसंख्यांकांसोबत जी क्रूर वर्तणूक हे दहशतवादी करत आहेत ती फारच गंभीर बाब असून त्यामुळे केवळ कुर्द भागालाच नव्हे तर संपूर्ण इराक देशालाच धोका निर्माण झाला आहे. स्टेनमेअर यांनी गेल्या आठवड्यात इराकचे पंतप्रधान हैदर अल अब्दादी यांची बगदाद येथे तर कुर्दिश अध्यक्ष मसूद बरझानी यांची इर्बिल येथे भेट घेऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली होती. याभागात छळ करण्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते.

Leave a Comment