योगगुरू बीकेएस अय्यंगार कालवश

yogguru
पुणे – केवळ भारतातीलच नव्हे तर परदेशातील कोट्यावधी साधकांना योगाचे प्रशिक्षण देणारे आणि आपले अवघे आयुष्य योगप्रसारासाठी वाहून घेतलेले योगगुरू बीकेएस अय्यंगार यांचे पुण्यात पहाटे ३ च्या सुमारास निधन झाले. अय्यंगार यांना गेले काही दिवस मूत्रपिंडाचा विकार होता व त्यामुळे त्यांच्यावर प्रयाग रूग्णालयात डायलिसिस व अन्य उपचार सुरू होते. तेथेच त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. ते ९६ वर्षांचे होते. त्यांच्यावर दुपारी पुण्यातच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांना २०१४ मध्ये पद्मविभूषण सन्मानाने गौरविण्यात आले होते.

कर्नाटकातील बेल्लूर येथे जन्मलेल्या अय्यंगार यांनी म्हैसूर येथे योगप्रशिक्षण घेतले होते आणि मेव्हणे कृष्णम्माचारी यांच्या सल्ल्याप्रमाणे वयाच्या १८ व्या वर्षीच पुण्यात येऊन त्यांनी योगप्रसाराचे काम हाती घेतले होते. टाईम मासिकाने जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्यांना स्थान दिले होते.योगसाधनेत सतत नवीन विचार करून आणि दीर्घ अभ्यासाने त्यांनी अय्यंगार योग, पतंजली योग आणि प्राणायम यांची विशिष्ट पद्धती उपयोगात आणली होती. त्यांच्या शिष्यांमध्ये बेल्जियमची राणी, महान व्हायोलिन वादक यहुदी मेनुहिन, जयप्रकाश नारायण अशा अनेक महान व्यक्तींचा समावेश होता. मेनुहीन याच्यामुळे त्यांना परदेशातही योगशिक्षण देण्याची संधी मिळाली आणि अय्यंगार गुरूजींनी परदेशातही सुमारे ५ कोटी योग प्रशिक्षक तयार करण्याची कामगिरी पार पाडली होती.

योगविषयावर त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांची १४ पुस्तके प्रकाशित झाली असून त्याचे १७ भाषांत भाषांतर झाले आहे. भारत सरकारने त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्धविभूषण सन्मानाने भूषविले आहे. पुण्यात पत्नीच्या निधनानंतर त्यांनी रमामणी अय्यंगार योगप्रशिक्षण संस्था स्थापली आहे. येथे देश विदेशातील शिष्यांना योगप्रशिक्षण दिले जाते. परदेशातील त्यांचे शिष्य त्यांचा वाढदिवस दरवर्षी भर दुपारी १२ वाजता रस्त्यात योगासने करून साजरा करत असतात.

Leave a Comment