छोटा राजनचा भाऊ दीपक आरपीआयचा उमेदवार

deepak
मुंबई – भाजपसेना महायुतीत सामील झालेल्या रिपब्लीकन पार्टीने जागा वाटपाबाबत अजून कोणतीच बोलणी झाली नसतानाही आपली १३ विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात मुंबईचा अंडरवल्ड डॉन छोटा राजन याचा भाऊ दीपक निखालजे याला चेंबूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली गेली आहे. विशेष म्हणजे नुकतीच आरपीआयमध्ये दाखल झालेली राखी सावंत हिला मात्र पहिल्या यादीत तरी स्थान दिले गेलेले नाही. राखीने पक्षात प्रवेश करताच रामदास आठवले हेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार असल्याचे वक्तव्य केले होते. राखीने लोकसभेची निवडणूक तिच्या स्वतंत्र पक्षाकडून लढविली होती.

आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी आपली यादी अगोदरच जाहीर करून महायुतीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे. २००९ सालातही दीपक निखालजे याला चेंबूरमधूनच उमेदवारी दिली गेली होती मात्र त्यावेळी काँग्रेसचे चंद्रकांत हांडोरे यांनी त्याचा पराभव केला होता. आरपीआयच्या यादीत माजी आयपीएस अधिकारी पी.के. जैन यांचाही समावेश असून पुण्यातून कॅम्प भागातून परशुराम वाडेकर व चिंचवड मधून चंद्रकांत सोनकांबळे यांना उमेदवारी दिली गेली आहे. आरपीआयने जाहीर केलेल्या जागांपैकी कांही सेनेच्या तर कांही भाजपच्या कोट्यातील आहेत. हे दोन्ही पक्ष या जागा आरपीआय साठी सोडणार का याचा कोणताही खुलासा केला गेलेला नाही.

Leave a Comment