गोविंदा मंडळांची सुरु झाली पळापळ

dahi-handi17
मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे उल्लंघन करीत राज्यातील बहुतांशी गोविंदा मंडळांनी आपलेच खरे बाकी सर्व खोटे असे ग्राह्य धरीत पाचपेक्षा जास्त थर व बालगोविदांचा समावेश करीत यंदाचा दहीहंडी उत्सव मोठ्या जोमाने साजरा केला. पण आता आपल्यावरही कारवाईचा बडगा उठू शकतो या भीतीने गोविंदा मंडळांची पळापळ सुरु झाली आहे. यंदाच्या दहीहंडी उत्सवात दोन गोविंदांचा मृत्यू झाला असून शेकडो गोविंदा जख्मी झाले आहेत.

यावर्षीचा दहीकाला बालगोविंदामुळे चांगलाच चर्चेत होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने ह्या उत्सवावर निराशेचे सावट आणले होते. पण गोविंदा मंडळांनी सर्वोच्च न्यायालयाचा देखील अपमान केल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळाले. न्यायालयाचा आदेश झुगारून अनेक मोठ्या मंडळांनी खोटे जन्मदाखले दाखवून लहान मुलांना थरावर चढवले होते. दोघांचा बळी गेल्यानंतर गोविंदा मंडळांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. जे बालगोविंदा थरावर चढले होते, त्यांना पालकांसह बाहेरगावी पाठविले जात आहे. काही बालगोविंदा जखमी झाले आहेत, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू करून प्रकरण लपविण्याचा प्रकारही सुरू आहे.

काही मंडळाच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, कोर्टाने दहिहंडीसाठी काही नियम बनविले होते, अनेक मोठ्या मंडळांनीच केवळ मोठ्या बक्षिसांकरिता हे नियम धाब्यावर बसवले. नियम डावलून आम्हालाही उंच थर लावणे शक्य होते, पण आम्ही कोर्टाचा आदर केला. मात्र आमच्याच काही मित्रांनी कोर्टाचाच नाही तर मंडळाच्याही भावनांचा अपमान केला आहे. एकीच्या या उत्सवात फुट पाडली आहे. हा उत्सव साजरा करण्यासाठी केलेल्या मेहनतीवर या मंडळांनी पाणी फेरले आहे. केवळ पैशासाठी जन्माष्टमीसारख्या उत्सवाला बदनाम करणार्‍या मंडळांवर कारवाई झालीच पाहिजे.

Leave a Comment