
मुंबई – दहीकाला साजरा केल्यानंतर आता वेध लागले आहेत सुखकर्त्या गणरायाच्या आगमनाचे. मागील वर्षापर्यंत गणेशोत्सवाच्या कालावधीत केवळ एकच दिवस रात्री बारा वाजेपर्यंत डीजेसह ढोलताशांना परवानगी होती. आता त्यात बदल करून उत्सव काळातील चार दिवस रात्री बारा वाजेपर्यंत वाद्ये वाजवण्यास परवानगी देण्यात असून ती यंदाही कायम ठेवण्यात आली असून, २, ४, ७ आणि ८ सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत वाद्ये वाजवता येणार आहेत.
आता रात्री बारा वाजेपर्यंत वाजवा रे वाजवा
केवळ १५ दिवसांकरता रात्री बारा वाजेपर्यंत वाद्ये वाजवण्यास परवानगी असल्याचे मुंबई न्यायालयाच्या आदेशात म्हटल्यामुळे गणेशोत्सव मंडळांना दिलासा मिळाला आहे. मागील वर्षापर्यंत गणेशोत्सवादरम्यान केवळ एकाच रात्री परवानगी दिली जात होती. परंतु संपूर्ण उत्सवात रात्री बारा वाजेपर्यंत वाद्ये वाजवण्यास परवानगी दिली जावी, अशी मागणी गणेशोत्सव मंडळांनी केली होती. त्यानुसार, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने याबाबत सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतर मागील वर्षीपासून चार रात्री बारा वाजेपर्यंत वाद्ये वाजवण्यास परवानगी देण्यात आली.
मात्र या चार रात्री कोणत्या असाव्यात, हे ठरवण्याचे अधिकारी समन्वय समितीवर सोपवण्यात आले होते. त्यानुसार यंदाही राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यानुसार चार रात्री निश्चित करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी दिली.पाच दिवसांच्या गणेशमूर्तीच्या विसर्जनाच्या दिवशी म्हणजेच २ सप्टेंबर रोजी, ४ सप्टेंबर रोजी गौरी विसर्जनाकरता, अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी म्हणजे ७ सप्टेंबर आणि ९ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी असे चार दिवस निश्चित करून सरकारकडे प्रस्ताव पाठवल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
