असांजे इक्वेडोर दूतावास सोडणार

julian
लंडन – अमेरिकेची गुप्त लष्करी कागदपत्रे विकिलिक्सच्या माध्यमातून जाहीर करणारा ऑस्ट्रेलियन नागरिक ज्युलियन असांजे त्याने आश्रय घेतलेला इक्वेडोरचा दूतावास लवकरच सोडणार असल्याचे सोमवारी जाहीर करण्यात आले आहे. असांजे आणि इक्वेडोरचे परराष्ट्र मंत्री रिकाडो पेटिनो यांनी संयुक्तरित्या पत्रकारांना ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे असांजे दुर्धर आजाराने ग्रस्त असून त्याच्यावर उपचार होण्याची गरज असल्याच्या बातम्या येत असतानाच ही घोषणा करण्यात आल्याने त्याला विशेष महत्व दिले जात आहे.

असांजेने गेली दोन वर्षे या दूतावासात आश्रय घेतला आहे. असांजेवर लैगिक छळाचे आरोप असून त्या संदर्भात तो स्वीडन सरकारला हवा आहे. मात्र असांजेने हे आरोप फेटाळले असून स्वीडनला हस्तांतरण केले गेले तर त्याला अमेरिकेत पाठविले जाईल आणि त्याने अमेरिकेची गुप्त कागदपत्रे जाहीर केल्यामुळे त्याला ३५ वर्षांचा तुरूंगवास ठोठावला जाईल अशी भीती त्याने व्यक्त केली आहे. मध्य लंडनमधील या दूतावासासमोर स्कॉटलंड यार्डचे दोन पोलिस सतत पहार्‍यावर असून असांजे बाहेर आला तर त्याला अटक केली जाणार आहे.

४९ वर्षीय असांजे हृदय आणि फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त आहे. इक्वेडोरचे परराष्ट्रमंत्री पेटिनो यांच्या म्हणण्याप्रमाणे इक्वेडोरने असांजेला राजाश्रय दिला असल्याने त्यांचे संरक्षण त्याला सुरू राहणार आहे. गेली दोन वर्षे त्याने अनिश्चित आणि कायदेशीर संरक्षणाविना काढली आहेत. ही परिस्थिती आता संपली पाहिजे. या संदर्भात ते ब्रिटीश परराष्ट्रमंत्री फिलिप हामोंड यांची भेट घेणार आहेत

Leave a Comment