डीजेच्या तालावर सुरु दहीहंडीचा थरार

dahi-handi
मुंबई – मुंबई, ठाणे, कल्याण आणि डोंबिवलीत आज सुरु आहे तो दहीहंडीचा माहोल. आज जिकडे तिकडे डिजेच्या तालावर थिरकरणारी पावले, उंचावर बांधलेली हंडी फोडण्यासाठी येणारे गोविंदा आणि दहीहंडीचा थरार रस्त्यावर थांबून अनुभवणारे सर्वसामान्य असे चित्र आहे मुंबापुरीत.

दहीहंडी उत्सवाला या चार प्रमुख शहरांमध्ये उत्साहात सुरुवात झाली असून कसून सराव करणारी मंडळे लाखो रुपयांच्या हंडया फोडण्यासाठी बाहेर पडली आहेत. यंदाचा दहीहंडी उत्सव उत्सवातील बालगोविदांचा सहभाग आणि लाखो रुपयांच्या बक्षीसांसाठी गोविंदा मंडळांमध्ये सुरु झालेली जीवघेणी स्पर्धा यामुळे वादाच्या भोव-यात सापडला होता.

दहीहंडी उत्सवावर मुंबई उच्च न्यायालयाने निर्बंध आणल्यानंतर काही प्रमुख आयोजकांनी आपल्या हंडया रद्द केल्याने यंदा दहीहंडी उत्सव होणार कि नाही असा प्रश्न निर्माण झाला होता.

सराव करणाऱ्या गोविंदाना दिलासा दिला तो सर्वोच्च न्यायालयाने. उच्च न्यायालयाच्या निर्बंधाना सर्वोच्च न्यायालयाने वर्षभराची स्थगिती दिल्यानंतर उत्सवावरील अनिश्चिचतेचे सावट दूर झाले.

प्रसारमाध्यमांनी गोविंदांच्या सुरक्षेचा मुद्दा लावून धरल्याने यंदा प्रमुख आयोजकांनी गोविंदांच्या सुरक्षेसाठी पावले उचलली आहेत. काही आयोजक वरच्या थरावर जाणा-या गोविंदांना सेफ्टी बेल्ट, हेल्मेट देणार आहेत. त्यामुळे दरवर्षी पेक्षा यंदा जखमी गोविंदाचे प्रमाण कमी असेल अशी अपेक्षा आहे.

Leave a Comment