मोदी सरकारची महिला बँक कर्मचार्‍यांना गोड भेट

bank
नवी दिल्ली – देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या महिला कर्मचा-यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महिला कर्मचा-यांना मनाप्रमाणे म्हणजे हव्या त्या ठिकाणी पोस्टींग आणि बदली दिली जाणार आहे. त्यासंदर्भात निर्णय घेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयाने सर्व बँकांना महिलांच्या सोयीनुसार बदली धोरण आखण्याच्या सूचना केल्या आहेत. अशा प्रकारचा निर्णय झाल्यास महिलांना पती किंवा आई-वडील असणा-या ठिकाणी बदली करून घेता येणे शक्य होणार असल्याचा विचार यामागे असल्याचे सांगितले जात आहे.

महिलांना आपल्या घरापासून दूर राहून काम करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यात महिला विवाहित असेल आणि लहान मुले असतील तर त्या मुलांचीही गैरसोय होते. त्यामुळे महिलांना सतत असुरक्षिततेची जाणीव होत असते. या संदर्भात अर्थ मंत्रालयाने सर्व बँकांना पत्र पाठवले असून त्यात नमूद केले आहे की, शक्यतो विवाहित महिला कर्मचार्‍यांना त्यांचे कुटुंब राहात असेल त्या ठिकाणी किंवा पती काम करत असेल त्याच्या आसपासच्या ठिकाणी बदली देण्यात यावी, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

दरम्यान केंद्र सरकारने अनुकंपा तत्वावर २००४ -०५ नंतर बंदी लावली होती. परंतू आता ही बंदी उठविण्यात आली असून पुन्हा अनुकंपावर नोकरी देण्याचे धोरण स्वीकारले असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. येत्या ५ ऑगस्टपासून हे धोरण लागू करण्यात आले आहे.

Leave a Comment