जन्माष्टमी

shrikrushan
योगेश्वर श्रीकृष्णाने पृथ्वीतलावर जन्म घेतला तो दिवस म्हणजे जन्माष्टमी. भारतभर मोठ्या उत्साहात साजरा होणारा हा सण अनेक नावानी ओळखला जातो. श्रीकृष्णजयंती, गोकुळ अष्टमी, अष्टमी रोहिणी, कृष्णाष्टमी अशी ही नांवे आहेत. श्रावणातील वद्य अष्टमीला कृष्णाचा जन्म रात्री १२ वाजता मथुरेत कंस राजाच्या कैदेत झाल्याची कथा आपल्याला सर्वांनाच परिचित आहे.

मथुरेचा राजा कंस अतिशय अत्याचारी आणि दुष्ट होता. त्याला शाप मिळाला होता की बहिणीचे आठवे अपत्य तुझा वध करणार आहे. म्हणून त्याने बहीण देवकी आणि तिचा पती वसुदेव यांना तुरूंगात बंद केले. देवकीला अपत्य झाले की कंस येऊन ते मारून टाकत असे. आठवे अपत्य मात्र वेळेआधीच जन्माला आले. अर्ध्या रात्री जन्मलेल्या या बाळाच्या जन्माचे कौतुक करण्यास मात्र मातापित्यांना वेळ नव्हता कारण कंस कधीही येऊन त्याला ठार करेल या भीतीने दुथडी भरून वाहणार्‍या यमुनेतून हे अलौकिक बालक पिता वसुदेवाने रातोरात गोकुळात नंदघरी पोहोचविले आणि त्याच्या जागी यशोदा नंदाची मुलगी रोहिणीला आणून देवकीच्या कुशीत झोपविले. बाळ जन्माला आल्याची वार्ता येताच कंसाने तुरूंगात येऊन या बालिकेलाच पहिल्या सात अपत्यांप्रमाणे दगडावर फेकून मारण्याचा प्रयत्न केला पण ही रोहिणी आकाशात उडाली आणि जाता जाता तिने कंसाला तुझा काळ जन्माला आला असल्याचे सांगितले आणि नंतर खरोखरच कृष्णाने कंसाचा वध केला.

कृष्णाचा हा जन्मदिवस मोठ्या उत्साहाने देशभरात साजरा होतो. विष्णुच्या दशावतारापैकी आठवा अवतार म्हणजे श्रीकृष्णावतार. मथुरा, वृंदावन त्याचप्रमाणे श्रीकृष्णाची राजधानी असलेल्या द्वारका नगरीत हा सण विशेष मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो. मध्यरात्री पाळण्यात श्रीकृष्णाची छोटी मूर्ती घालून सजवलेला पाळणा हलविला जातो, विविध गाणी, भजने गाऊन, रासलिला खेळून जन्मोत्सव साजरा होतो आणि नंतर प्रसाद म्हणून सुंठवडा वाटला जातो. या दिवशी उपवास करण्याची पद्धत आहे. या उपवासाचे पारणे दुसरे दिवशी फेडले जाते.

कांही घरात या दिवशी गोकुळ करण्याची पद्धत आहे. आता ही पद्धत फारच थोड्या ठिकाणी पहायला मिळते. या दिवशी काळी माती आणून ती चाळून पाणी घालून मळायची आणि या मातीच्या छोट्या छोट्या मूर्ती बनवायच्या. कृष्ण, बलराम, नंद, यशोदा, पाळणा, धेनू, विहीर , गोपगोपी अशा अनेक मूर्ती बनवायच्या आणि एखादे गांव वसवावे तशा त्या पाटावर मांडून गोकुळ तयार करायचे. श्रीकृष्ण जन्मानिमित्त तांदळाचे लाडू नैवेद्य म्हणून करण्याची प्रथा आहे. या दिवशी मंदिरांतून अनेक घरांतून आणि सार्वजनिक कार्यक्रमातून काल्याचे कीर्तन केले जाते. अनेक ठिकाणी या दिवशी पतंग उडविण्याची प्रथाही आहे. श्रावण वद्य प्रतिपदेपासून ते श्रावण अष्टमीपर्यंत हा सण साजरा केला जातो.

उत्तरप्रदेशात जागजाग या दिवशी रासलिला खेळली जाते. रंग उडवून आनंद व्यक्त केला जातो. दुसरे दिवशी नंदोत्सव साजरा केला जातो व या दिवशी विविध प्रकारच्या भेटवस्तू दिल्या जातात. मथुरा, वृंदावन आणि द्वारकेत या दिवशी हा उत्सव पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. भारताबरोबरच नेपाळ आणि बांग्लादेशात ही हिंदू हा सण साजरा करतात.

खोडकर बालकृष्ण, गोपींचा कृष्ण, भाबड्या गोविदाचा सखा कृष्ण, सुदाम्याचे पोहे खाणारा कृष्ण, कालियाचा वध करणारा कृष्ण, धेनूंचा संभाळ करणारा कृष्ण, राधेचा कृष्ण, द्वारकाधीश कृष्ण, असूरांचा नायनाट करणारा पराक्रमी कृष्ण, यादव कुळाचा उद्धारक कृष्ण, महाभारतात गीता सांगून घाबरलेल्या अर्जुनाला युद्धासाठी तयार करणारा कृष्ण, आणि आपल्या अवीट वेणूवादनाने गाईगुरांसह माणसांनाही मोहित करणारा कृष्ण अशी अनेक रूपे धारण करणारा कृष्ण अवघ्या भूलोकीचा प्रिय सखा न बनला तरच नवल. ज्याला ज्या स्वरूपात तो आवडेल त्या स्वरूपाचे ध्यान करा. तो तुमच्यासोबत हजर आहे. तो कधीही, कुठेही, कधीही, केव्हाही आपल्यासोबत आहेच. कारण त्याने आपल्याला वचनच दिले आहे,- यदा यदा ही धर्मस्य ग्लानीर्भवति भारत, अभ्युथानं अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम, परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम, धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे.

Leave a Comment