गोपाळकाला

gopal
कृष्णाष्टमीनंतर दुसरे दिवशी साजरा केला जातो दहीहंडीचा उत्सव. महाराष्ट्रात आणि भारताच्या अन्य राज्यातही हा उत्सव साजरा होतो आणि त्याला आता तर सार्वजनिक स्वरूप आले आहे. या दिवशी उंच जागी दही पोहे भरलेली आणि फुलांच्या माळांनी सजविलेली हंडी टांगली जाते आणि गोविदांची पथके एकावर एक थर रचून ही हंडी फोडतात. त्यासाठी मोठमोठी बक्षीसेही लावली जातात. गाणी, नाच, उंच चढणार्‍या गोविंदांच्या अंगावर पाणी फेकून त्यांना खाली पाडण्याचा प्रयत्न असा एकच दंगा यावेळी चाललेला असतो. या मडक्याचा तुकडा मिळाला तर घरी आणून सांभाळून ठेवला जातो. त्याने घरात समृद्धी येते अशी भावना आहे.

कृष्णाष्टमीच्या दुसरे दिवशी गोपाळकाला करण्याची पद्धत आहे. करायला अतिशय सोपा, चटकन होणारा आणि तरीही अतिशय चविष्ट असा हा पदार्थ कसा बनतो याची माहिती घेऊया. कृष्ण गोपांसमवेत जेव्हा गायी राखण्यासाठी कुरणात जात असे तेव्हा प्रत्येकाने जी शिदोरी आणली असेल ती सर्व एकत्र करून म्हणजे त्याचा काला करून त्याचा फराळ हे गोप करत असत. म्हणून तो गोपाळ काला.

साहित्य- साळीच्या लाह्या, चुरमुरे, ज्वारीच्या लाह्या, जाड पोहे हे सर्व सम प्रमाणात, फुटाण्याचे डाळे, आंबा लोणचे, लिंबाचे गोड लोणचे, दही, थोडे ताक, कोथिंबिर, साखर, मीठ चवीप्रमाणे आणि आवडत असल्यास फोडणी.

कृती- प्रथम पोहे स्वच्छ करून पाण्याने धुवून निथळावेत. नंतर दोन्ही लाह्या, चुरमुरे, पोहे, डाळ एकत्र करावे. त्यात आंब्याचे लोणचे, लिंबाचे लोणचे कुसकरावे. थोडी मोहरी आणि कोथिंबीर, आले आणि हिरवी मिरची बारीक वाटून मिश्रणात घालावी. साखर, मीठ घालावे. नंतर त्याला प्रथम ताकाचा हात लावून मिश्रण कालवावे. खाते वेळी आवडीनुसार दही घालून सरसरीत कालवावे. आवडत असल्यास वरून जिरे हिंग घातलेली तुपाची फोडणी द्यावी. कोथिबीर घालून खाण्यास द्यावे. अतिशय चविष्ट असा हा काला सर्वांनाच आवडेल यात शंका नाही.केळीच्या पानावर घेऊन खाल्ल्यास चव अधिक सुंदर लागते हा स्वानुभव.

यात आवडत असल्यास काकडीचे तुकडे बारीक चिरून घालता येतील तसेच पेरूच्या फोडी चव आणखी वाढवितील.

Loading RSS Feed

Leave a Comment