अमेरिकेत कोंबड्यामुळे वाहतूक कोंडी

cock
भारतासारख्या देशांतून रस्त्यातून गाई, म्हशी, गाढवे, डुकरे, कोंबड्या व तत्सम प्राणी सुखनैव जात असतात व त्यामुळे बरेचवेळा वाहतूक खोळांबते. भारतीयांना या प्रकरणात विशेष काय असे वाटत असेलही. पण असल्या प्रकारांना अमेरिकेसारखा प्रगत देशही अपवाद नाही हे नुकतेच सिद्ध झाले.

अमेरिकेतील ओरेगॉन प्रांतात एका हमरस्त्यावरून रमतगमत जाणार्‍या कोंबड्यामुळे तेथे ट्रॅफिक जाम होण्याची पाळी आली आणि अखेरी पोलिसांना पाचारण करावे लागले. मिळालेल्या माहितीनुसार भरधाव वेगाने वाहतूक होत असलेल्या या रस्त्यावर एका ऐटदार कोंबड्याची स्वारी अवतरली. त्याक्षणी वाहने थांबली आणि कोंबड्याला मार्ग खुला करून दिला गेला. मात्र कोंबडा त्या दिवशी बराच निवांत होता. त्याला कोणतीच घाई नसल्याने तो रस्ता ओलांडताना अगदी रमतगमत चालला होता. बराच वेळ झाला तरी कोंबड्याची स्वारी रस्त्यावरच राहिल्याने अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले.

पोलिसांना प्रथम हा प्रँक कॉल वाटला मात्र फोन करणार्‍यांने असा प्रकार खराच घडत असल्याचे सांगितल्यावरून पोलिस निघाले. मात्र ते संबंधित स्थळी पोहोचेपर्यंतच कोंबडा भुर्रकन उडून गेला होता. त्यावेळेपर्यंत वाहनांची इतकी लांब रांग लागली होती की बराच काळ लोकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

Leave a Comment