विधानसभा निवडणूक; इच्छुकांच्या मुलाखती उद्यापासून

congress
मुंबई – कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाच्या मुद्यावरून कुरघोडीचे राजकारण अजूनही सुरू असताना प्रदेश रविवार १७ ऑगस्टपासून कॉंग्रेसने २००९ च्या सूत्रानुसार इच्छुकांच्या मुलाखती घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

येत्या १७, १९ आणि २० ऑगस्ट रोजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वातील निवडणूक समिती इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेईल, असे प्रदेश कॉंग्रेसने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. २००९ च्या सूत्रानुसार कॉंग्रेसच्या वाट्याला आलेल्या १७४ मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती यावेळी घेतल्या जातील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने १७४ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने ११४ जागा लढविल्या होत्या. राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत सुरू असलेली जागावाटपाची चर्चा संपल्यानंतर इतर मतदारसंघांबाबत निर्णय घेतला जाईल, असेही निवेदनात म्हटले आहे.

बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक समितीमध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, एआयसीसीचे सरचिटणीस मुकुल वासनिक व गुरूदास कामत आणि सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण व नारायण राणे या तीन माजी मुख्यमंत्र्यांसह इतर काही नेत्यांचा समावेश आहे. इच्छुकांनी मुलाखतीला येताना कोणाचेही शिफारस पत्र आणू नये, असे प्रदेश कॉंग्रेसकडून सांगण्यात आले असून, ज्यांनी ११ ऑगस्ट या निर्धारित कालावधीपर्यंत आपले अर्ज सादर केले होते त्यांनाच मुलाखतीला बोलावले जाईल, असे प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितले.

Leave a Comment