रंगना हेरथने घेतले एका डावात नऊ बळी

herath
कोलंबो – श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज रंगना हेरथने पाकिस्तान विरुध्द सुरु असलेल्या दुस-या कसोटी सामन्यात एकाच डावात नऊ बळी घेण्याची किमया साधली असून आणखी एक बळी हेरथने मिळवला असता तर, एका डावात दहा बळी मिळवण्याच्या अनिल कुंबळे आणि जिम लेकर यांच्या विक्रमाशी त्याची बरोबरी झाली असती.

हेरथने नऊ बळी मिळवूनही पाकिस्तानने श्रीलंकेवर बारा धावांची निसटती आघाडी घेतली. पहिल्या डावात श्रीलंकेने ३२० धावा केल्या तर, पाकिस्ताचा डाव उपहारापूर्वी ३३२ धावांवर संपुष्टात आला. ५८ धावांची खेळी खेळणा-या अहमद शेहझादला फक्त परेराने बाद केले. बाकीचे सर्व गडी हेरथने बाद केले. सरफराझ अहमदच्या (१०३) शतकाच्या जोरावर पाकिस्तानने निसटती आघाडी मिळवली.

भारताच्या अनिल कुंबळे आणि इंग्लंडच्या जिम लेकर यांच्या नावावर एक डावात दहाबळी मिळवण्याचा विक्रम आहे. १९५६ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या सामन्यात जिम लेकर यांनी १९ बळी मिळवले होते. यात पहिल्या डावात नऊ तर, दुस-या डावात सर्वच्या सर्व दहागडी बाद केले होते. १९९९ मध्ये पाकिस्तान विरुध्दच्या दुस-या कसोटी सामन्याच्या दुस-या डावात अनिल कुंबळेने पाकिस्तानचे सर्वच्या सर्व दहा गडी बाद केले होते.

Leave a Comment