नरेंद्र मोदींचा प्रेरक संदेश

narendra-modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना जनतेला उद्देशून भावनिक आवाहने तर केलीच पण देशाचा नियोजन आयोग बदलून त्या ठिकाणी नवी संस्था स्थापन करण्याचा व्यापक परिणाम घडविणारा धोरणात्मक निर्णय सुद्धा जाहीर केला. त्यांनी आपल्या भाषणात सामान्यातल्या सामान्य माणसाला कळेल अशा सोप्या संदेशापासून ते जगभरातल्या राजनीतीज्ञांना विचार करायला लावेल अशा उद्धरणापर्यंत सगळ्या गोष्टींचा समावेश आपल्या ७५ मिनिटांच्या भाषणात केला. आपल्या इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधानांचे भाषण इतक्या मोठ्या चर्चेचा विषय झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाट्यमय निर्णय घेण्याच्या बाबतीत आणि चित्ताकर्षक कृती करण्याच्या बाबतीत प्रसिद्धच आहेत. परंतु त्यांच्या अशा या नाट्यमय वर्तनामध्ये तिकडम्बाजी किंवा सवंगपणा नसतो. त्यांचे नाट्यमय वर्तन सखोल विचारांती केलेले असतेच, पण त्यामध्ये खूप मोठा अर्थ भरलेला असतो. त्यामुळे लोक प्रभावित होतात. काल त्यांनी पहिल्यांदाच लिखित भाषण करण्यास नकार दिला आणि उत्स्फूर्त भाषण केले. त्याशिवाय त्यांनी पंतप्रधानासाठी खास बनवल्या जाणार्‍या सुरक्षात्मक कवचाचा अव्हेर केला.

नरेंद्र मोदी यांच्या जीवाला तर सर्वाधिक धोका आहे, पण तरीही त्यांनी हा काचेचा संरक्षक कठडा नाकारला आणि उघड्यावर उभे राहून भाषण केले. भाषण संपल्यानंतर कमांडोंच्या संरक्षणाच्या बाहेर येऊन ते जनतेत मिसळले. भारताच्या आजवरच्या पंतप्रधानांमध्ये फेटा बांधून लाल किल्ल्यावरून भाषण देणारे ते पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. या छोट्या छोट्या गोष्टींतून पंतप्रधान बरेच काही सांगत असतात, पण ते सांगणे सूचक असते. या सगळ्या सूचक गोष्टींच्या पलीकडे नरेंद्र मोदी यांनी थेटपणे दिलेला जो संदेश आहे तो अधिक प्रेरणादायी आणि त्यांच्या कल्पनेतल्या देशाचे चित्र उभे करणारा होता. भारतातल्या प्रत्येक नागरिकाचे बँक खाते असले पाहिजे, अशी एक योजना त्यांनी जाहीर केली. भारतात सध्या दरडोई एक मोबाईल फोन आहे, मग प्रत्येकाकडे मोबाईल असेल त्याचे बँक खाते असायला काय हरकत आहे, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. प्रत्येकाचे बँक खाते आणि प्रत्येकाकडे असलेला मोबाईल फोन या दोन गोष्टींच्या आधारे नरेंद्र मोदी संपन्न भारत आणि डिजीटल भारत निर्माण करू इच्छित आहेत. या दोन गोष्टींमध्ये देशासमोरच्या किती तरी समस्या सोडविण्याची क्षमता आहे.

एकदा प्रत्येकाकडे मोबाईल आला की देशाचा कारभार ऑनलाईन करण्याची कल्पना राबवता येते. म्हणूनच नरेंद्र मोदी यांनी ई-गव्हर्नन्स् हा परवलीचा शब्द करण्याचे ठरवले आहे. ई-गन्हर्नन्स् म्हणजे ईझी गव्हर्नन्स्, ईफेक्टिव्ह गन्हर्नन्स् आणि ई-गव्हर्नन्स् म्हणजे इकॉनॉमिकल गव्हर्नन्स्. अर्थ उघड आहे नरेंद्र मोदी यांना देशाचा कारभार सोपा, प्रभावी आणि कमीत कमी खर्चात करायचा आहे. या गोष्टी झाल्यास देशासमोरच्या किती तरी समस्या सोडविण्यास मदत होणार आहे हे थोडासा विचार केल्यानंतर लक्षात येते. प्रत्येकाचे बँक खाते हा तर आर्थिक प्रश्‍न सोडविण्यातला फार मोठा उपाय ठरणार आहे. कारण बँक खाते आणि मोबाईल एकत्र आले की, आर्थिक व्यवहार बँकेमार्फत करण्याची सवय लागते. हे व्यवहार सोपे, वेगवान, सुटसुटीत होतातच पण प्रत्येक व्यवहाराची अशी नोंद झाली की, नंबर दोनचा पैसा वापरण्याचे प्रमाण कमी होते. काळ्या पैशाला आळा घालायला बँक खाते आणि मोबाईल फोन असे उपयुक्त ठरू शकतात. आधुनिक काळाने उपलब्ध करून दिलेल्या या साधनांचा इतका प्रभावी उपयोग करण्याची कल्पना नरेंद्र मोदी यांच्या मनात आहे. लोकांच्या मनामध्ये देशभक्ती आणि देशाची उभारणी यांच्या धारणा पक्क्या करतानाच नरेंद्र मोदी यांनी स्वत:ला प्रधानमंत्री न म्हणवता प्रधान सेवक म्हटले.

देशातली जनता १२ तास काम करणार असेल तर आपण १३ तास काम करायला तयार आहे असे म्हणून त्यांनी फार वेगळाच संदेश दिला. देशाचे पंतप्रधान लोकांना प्रोत्साहित करत असतात, त्यांनाच मार्ग दाखवत असतात. परंतु नरेंद्र मोदी यांनी लोकांना मार्ग दाखविण्याचे आवाहन केले आणि लोकांनी दाखविलेल्या मार्गावर आपण लोकांच्या पुढे चालत राहू असा मनोदय व्यक्त केला. ही गोष्ट तशी सोपी वाटते, परंतु ती फार प्रदीर्घ आणि सखोल विचारांती व्यक्त झालेली आहे. पंतप्रधानांनी या भाषणामध्ये अनेक नव्या योजनांची घोषणा केली. प्रत्येक खासदाराने आपल्या मतदार संघातील एक खेडे आदर्श ग्राम म्हणून उभे करावे आणि पुढच्या पाच वर्षात एकंदरीत पाच गावांना आदर्श बनवावे. अशारितीने देशातील अडीच हजार खेडी आदर्श गावे म्हणून उभी राहतील अशी एक कल्पना त्यांनी मांडली. ती केवळ तोंडीच जाहीर करण्याची घोषणा नसून ती सविस्तरपणे तयार केलेली एक शास्त्रीय योजना आहे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या मतदारसंघातील खासदारांना ही योजना साकार करण्यासाठी मदत केली पाहिजे. तर मोदींचे स्वप्न साकार होणार आहे. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात स्वच्छ भारताचे स्वप्न मांडलेले आहे. महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने २०१९ पर्यंत स्वच्छ भारत मोहीम राबविण्याचे मोदींचे आवाहन आहे. स्वच्छ भारताची कल्पना मांडून केवळ ते थांबलेले नाहीत तर त्याचे सर्व व्यवहार्य तपशील विचारात घेऊन त्यांनी योजना सुद्धा सुरू केलेली आहे. २ ऑक्टोबरपासून देशातल्या प्रत्येक शाळेत स्वच्छतागृहे बांधण्याची योजना ते राबविणार आहेत. अशारितीने त्यांनी योजना छान आखलेल्या आहेत, परंतु त्या प्रत्येक योजनेत त्यांनी लोकांच्या सहकार्याची अपेक्षा केलेली आहे. लोक तिला किती प्रतिसाद देतात आणि त्या कामात किती सहभाग देतात यावर त्यांचे यश अवलंबून राहणार आहे.

Leave a Comment