धनगर समाजाचे चक्काजाम आंदोलन

dhangar
मुंबई – राज्य सरकारने धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासंदर्भात राज्यघटनेत तिसरी आणि स्वतंत्र सूची तयार करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा निर्णय बुधवारी घेतला. धनगर समाजाने याचे तीव्र पडसाद म्हणून फक्त एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभर चक्काजाम आंदोलन सुरु केले असून मुंबई, पुणे, ठाणे, अहमदनगर, सोलापूर, वाशिम, मराठवाड्यात ठिकठिकाणी धनगर समाजाचे हजारो कार्यकर्ते आंदोलन करीत आहेत.

राज्य सरकारने केलेली शिफारस कदापी मान्य करणार नाही अशी धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांनी भूमिका घेतली आहे. तर, राज्य सरकारच्या निर्णयाबाबत धनगर एसटी आरक्षण कृती समितीनेही नाराजी व्यक्त करीत आमच्याशी धोका केल्याचे म्हटले आहे.

या दरम्यान मुंबईतील कुर्ला रेल्वे स्टेशनवर आंदोलन सुरु असून तेथून जाणा-या ट्रेन थांबवल्या आहेत. पुण्यात चांदणी चौकात जोरदार आंदोलन सुरु आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये अहिल्या चौकात चक्काजाम केला आहे. नगर-मनमाड रस्त्यावरही मेंढ्या आणून वाहतूक थांबवली आहे. पंढरपूर, माळशिरस, बारामती, फलटण, सांगली, सातारासह कोल्हापूरात सर्वत्र चक्काजाम आंदोलन सुरु आहे. एसटी प्रवर्गात सामील होण्यासाठी लागणारे निकष धनगर समाज पूर्ण करीत आहे.

Leave a Comment