सोनिया गांधींचा प्रचार

sonia-gandhi
केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यापासून देशात जातीय दंगली उसळल्या असल्याचा हल्लागुल्ला करून सरकारला बदनाम करण्याचा एक कलमी कार्यक्रम कॉंग्रेस पक्षाने सुरू केला आहे. सोनिया गांधी यांनी केरळात बोलताना हेच सांगितले आणि लोकसभेमध्ये कॉंग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही असाच संदिग्ध आरोप केला होता. त्यावर सभापती सुमित्रा महाजन यांनी दंगली झालेल्या गावांची नावे तरी सांगा असे म्हटले तेव्हा त्यांची बोलती बंद झाली. कारण त्यांच्याकडे तशी नावेच नव्हती. त्यांना केवळ या सरकारची प्रतिमा खराब करायची आहे. कॉंग्रेसने आता सध्या तरी विरोधी पक्ष म्हणून असाच कार्यक्रम ठरवला आहे. मात्र अशा वावदूक प्रचाराचा जनतेवर काही परिणाम होत नाही कारण जनतेला सार्‍या गोष्टी कळतात. जातीय दंगली या काही देशात नव्या नाहीत. तेव्हा दंगली वाढल्या की, त्याला मोदी सरकारला जबाबदार धरण्याचा कॉंग्रेसचा डाव काही यशस्वी व्हायचा नाही.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी गावांची नावे दिली नाहीत पण ती देणे त्यांना सोयीचे नव्हते. सोनिया गांधी यांनी ही चूक दुरुस्त करून महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांची नावे घेतली आहेत पण ही चूक दुरुस्त करताना नवी चूक केली आहे. कायदा आणि सुव्यवस्था हा विषय राज्य सरकारचा असतो आणि या दोन्ही राज्यांत भाजपाचे सरकार नाही. महाराष्ट्रात तर कॉंग्रेसच्या हातात सत्ता आहे. अर्थात सोनिया गांधी यांचा या आरोपामागाचा हेतू चांगला नाही कारण सरकारचा कारभार अतीशय परिपक्वपणे चालला असल्याचे लोकांना ठळकपणे दिसत आहे. त्या तुलनेत विरोधी पक्ष म्हणून कॉंग्रेस पक्ष कमालीचा तोकडा, खुजा आणि अकार्यक्षम असल्याचे दिसत आहे. नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या सर्व सचिवांना काही नियम घालून दिले आहेत. भ्रष्टाचाराची गंगोत्री असलेल्या केंद्रीय सचिवालयात काम करणार्‍या विविध खात्यांच्या मुख्य सचिवांना यापुढे आपली मालमत्ता जाहीर करावी लागणार आहेच, पण त्यांना आपल्या मुलांच्या आणि पत्नीच्या नावाने असलेल्या मालमत्तेचेही तपशील सरकारकडे सादर करावे लागणार आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या मुळावर घाव घातला जाणार आहे. अशा प्रकारच्या निर्बंधांचा फार गवगवा न करता शांतपणे नरेंद्र मोदी प्रशासनावर आपली पकड बसवत आहेत. आपल्या देशाच्या स्वातंत्रोत्तर इतिहासामध्ये आणि देशाला जडलेल्या भ्रष्टाचार नावाच्या रोगावर काही उपाय योजत आहेत.

या तुलनेत कॉंग्रेसची कामगिरी पाहिली तर कॉंग्रेस या पक्षाचीच दया यायला लागते. अर्थात त्यांच्याकडून तशी फार अपेक्षा करता येत नाही. कारण आपल्या पक्षाच्या खासदारांनी आणि नेत्यांनी अभ्यासूपणे काही तरी करावे यासाठी या पक्षाच्या श्रेष्ठींनी कधीच प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले नाहीत. उलट आपल्या पक्षाच्या नेत्यांचे खच्चीकरण करून त्यांनी फार महत्वाकांक्षा बाळगू नये याबाबतच कॉंग्रेसमध्ये सातत्याने डावपेच आखले गेले. परिणामी सगळी सुमार दर्जाची माणसे या पक्षात भरलेली दिसतात. उलट नरेंद्र मोदी यांनी मात्र आपल्या पक्षाच्या सगळ्या खासदारांना अभ्यास करण्याच्या बाबतीत प्रवृत्त केले आहे आणि अभ्यासू खासदारांची नोंद घ्यायला सुरुवात केली आहे. कॉंग्रेस पक्षात या बाबत आनंदीआनंद आहे, कारण मुळात त्यांच्या नेत्या सोनिया गांधी यांचीच बुद्धीमत्ता आणि विद्वत्ता अगदी सुमार दर्जाची आहे. सोनिया गांधी या एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षा आहेत, त्यामुळे त्यांचे विधान माध्यमात प्रसिद्ध केले जाते. या अधिवेशनात सोनिया गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्ष म्हणून कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारा सकारात्मक संदेश द्यायला हवा होता. काही तरी दूरगामी कार्यक्रम सुचवायला हवा होता.

आज त्यांनी खूप काही बोलण्याची अपेक्षा होती, कारण मोदी सरकार वेगाने निर्णय घेत आहे. त्यातल्या काही निर्णयांना कॉंग्रेसचा विरोध आहे. ज्युडिशियल कमिशन नेमण्याविषयीचे एक विधेयक मांडले गेलेले आहे. विमा क्षेत्रात २६ टक्के परदेशी भांडवल गुंतविण्याची मर्यादा ४९ टक्क्यांपर्यंत केलेली आहे. त्याशिवाय संरक्षण क्षेत्रातील उत्पादनांत परदेशी गुंतवणूक वाढविण्याची तरतूद सरकार करणार आहे. असे किती तरी विषय समोर आलेले आहेत की, ज्या विषयांवर कॉंग्रेसच्या अध्यक्षा म्हणून सोनिया गांधी यांनी मतप्रदर्शन करण्याची अपेक्षा आहे. नरेंद्र मोदी यांचे सरकार घेत असलेल्या विविध निर्णयांबाबत कॉंग्रेस पक्षाचे मत काय आहे हे जाणून घेण्यास जनता उत्सुक आहे. परंतु यातल्या कोणत्याही विषयाला सोनिया गांधी यांनी स्पर्श केला नाही. कारण कोणत्याही निर्णयाविषयी मतप्रदर्शन करावे एवढी सोनिया गांधी यांची क्षमता नाही. या सगळ्या विषयांची प्राथमिक माहिती तर त्यांना नाहीच, पण त्यावर कोणी काही लिहून दिले तर ते वाचून देण्याएवढी सुद्धा बुद्धीमत्ता सोनिया गांधींकडे नाही. नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून देशात जातीय दंगली वाढल्या आहेत हे वाक्य लिहून दिल्यानंतर वाचायला सोपे आहे.मुस्लीम समाजाच्या मनात मोदी सरकारबद्दल चुकीचा समज निर्माण करणे त्यामुळे सोपे जाणार आहे तेवढाच उथळ हेतू त्यांच्यासमोर आहे.

Leave a Comment