‘वेड’ नादब्रह्माचे

naadbrmha
भारतीय संस्कृतीमध्ये संगीताला अनन्यसाधारण महत्व आहे. अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताची उज्ज्वल परंपरा अनेकांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करून जोपासली आहे. त्यामुळे भारतीय संगीत सातासमुद्रापार आपली ध्वजा दिमाखात फडकवित आहे. अभिजात संगीतासाठी तप:श्चर्या
करणा-यांना मानमरातब, ऐश्वर्य आणि कीर्ती प्राप्त करणे सध्याच्या काळात शक्य झाले आहे. मात्र संगीताचा उगम ज्या लोकसंगीतातून झाला; त्या लोकसंगीतातील अनेक प्रकार, वाद्य आणि कलाकार अद्याप उपेक्षित राहिले आहेत. काही विस्मृतीच्या वाटेवर आहेत. मात्र काही ‘वेडे’ कलावंत पैसा आणि प्रसिद्धी याची आस न ठेवता समाजाने दुर्लक्ष केलेले हे कलाप्रकार जिवंत ठेवण्यासाठी; त्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करीत आहेत.

रेणुका देवीची भजने आणि आरती यांच्या साथीने जाणारे ‘चौंडक’ हे असेच उपेक्षित वाद्य! कर्नाटकात मूळ असलेल्या सौंदत्तीच्या यल्लम्माच्या भक्तांना हे वाद्य माहिती असले; तरी रेणुका मातेचेच दुसरे महत्वाचे ठाणे असलेल्या माहूरच्या विदर्भातील परिसरात या वाद्याची ओळखही नाही. ज्यांना हे वद्य माहिती आहे; त्यांच्या लेखी देखील या वाद्याला प्रतिष्ठा नाही. खरेतर ज्या भक्तांकडून या वाद्याचा वापर केला जातो; ते भक्त आणि त्यांच्याबरोबर त्यांचे हे वाद्य यांच्या पदरी केवळ उपेक्षाच नव्हे; तर टवाळीच पडली आहे. मात्र चौंडके वादनाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून त्याची शास्त्रीय बैठक अधिक पक्की करण्याचा आणि या वाद्याला प्रतिष्ठा मिळवून देण्याचा चंग बांधला आहे पुण्यातील युवा कलावंत संतोष केवडे यांनी! त्यासाठी वाटेल किंमत मोजण्याची त्यांची तयारी आहे.

सध्या यल्लम्मा देवीचे भक्त असलेल्या आराधी भक्तांचे हे वाद्य समाजाकडून अव्हेरले जात असले तरी या वाद्याची पुरातन आणि समृद्ध परंपरा असल्याचे संतोष यांनी सांगितले. चौंडक हे वाद्य रेणुका माता आणि जमदग्नी ऋषी यांचा पुत्र परशुराम याने विकसित केल्याची श्रद्धा आहे. पित्याच्या आदेशाने प्रिय मातेचा वध केल्यानंतर त्यांच्याच वराने परशुरामाने आपल्या मातेचे प्राण पुन्हा मिळविले. त्यानंतर तिला कायम आनंदी ठेवण्यासाठी परशुराम चौंडक या वाद्याचे वादन करीत; अशी आख्यायिका आहे. त्यामुळे सध्याही रेणुका मातेच्या भजन आणि आरतीला चौंडक हे तालवाद्य आणि सुती हे तंतुवाद्य वाजविले जाते.

चौंडक हे वाद्य लाकडाच्या भांड्याला पातळ चामड्याचा तळ बसवून बनविले जाते. त्या चामडी तळाच्या मध्यभागी नारळाची करवंटी घासून बनविलेल्या एका छोट्या बटणासारख्या चकतीमधून ओवलेली वादी किंवा तात काढली जाते. या वादीचा ताण कमी – जास्त करण्यासाठी ती एका लाकडी गट्टूला गुंडाळलेली असते. ही वादी बोटाने वाजवून चौंडक वाजविले जाते. मूळ स्वरूपातील वाद्य बनविताना लाकडाऐवजी खापराच्या भांड्याचा वापर केला जात असे. मात्र सध्याच्या काळात खापराचे भांडे मिळविणे अवघड असल्याने आणि मुख्यत: ते हाताळणे, वापरणे कठीण असल्याने लाकडाच्या भांड्याचा वापर केला जातो. या लाकडाच्या भांड्याला चामड्याचा तळ लावताना देखील उडदाची डाळ वाटून त्याने तो चिकटविला जातो. त्यासाठी फेव्हिकॉलसारख्या साधनाचा वापर केल्यास तळाला योग्य तो ताण देणे कठीण जाते आणि त्याचा वाद्याच्या नादावर परिणाम होतो; असे संतोष सांगतात.

सध्या हे वाद्य शास्त्रीय पद्धतीने वाजविणारे कलावंत मोजकेच आहेत. बहुतेक जण केवळ तुटपुंज्या माहिती अथवा सरावाने भजनाच्या साथीपुरते चौंडक वाजवितात. अनेक जण पैशाच्या आमिषाने उथळ आणि विकृत पद्धतीने हे वाद्य वाजवितात. त्याचप्रमाणे सवंग विनोदनिर्मितीसाठी या वाद्याचा वापर होतो. त्यामुळे मुळात सामाजिक विषमतेमुळे उपेक्षेला आणि हेटाळणीला पात्र झालेल्या या वाद्याच्या दुर्लौकीकात भर पडते; अशी खंत संतोष यांनी व्यक्त केली. वास्तविक या वाद्याला भक्कम शास्त्रीय बैठक आहे. तबला किंवा पखवाज, मृदुंग या तालवाद्यांप्रमाणे चौंडक वाजविण्याला ताला- मात्रांची रचना आहे. या वाद्याच्या मात्रांना ‘अवसान’ म्हटले जाते. तबल्याच्या एकताल, त्रिताल, झपताल याप्रमाणेच चौंडक्याचे ८-१६ चे अवसान, १६-३२ चे अवसान, १२-२४ चे अवसान; असे ताल असतात. तबल्याचे कायदे, तुकडे, पेशकार याप्रमाणे यातही निमकी, दुडकी, झुमकी किंवा धुमकी असे प्रकारही यात आहेत. चौंडक या वाद्याची शास्त्रीय बैठक अधिक दृढ करून त्याला व्यापक ओळख आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचा संतोष यांचा निर्धार आहे. ‘सुती’च्या साथीने चौंडक्याचे एकल (सोलो) वादन होऊ शकते असा त्यांचा विश्वास असून ते रसिकप्रिय करण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

केवडे यांचा पुण्याच्या स्वारगेटजवळील राष्ट्रभूषण चौकात ऐतिहासिक वाडा होता. दोनशे वर्षांचा इतिहास असलेल्या या वाड्यात रेणुका मातेचे मंदिर होते. आता या वाड्याच्या जागेवर इमारत उभी राहिली असली तरी मंदिर केवडे कुटुंबियांनी अद्याप जतन केले आहे. या मंदिरामुळेच केवडे यांच्या घरात अनेक पिढ्यांपासून चौंडक वाजविले जाते. त्यातूनच संतोष यांच्या मनात या वाद्याबद्दल आपुलकी निर्माण झाली. या वाद्याचे शास्त्रीय प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांनी थेट महाराष्ट्र- कर्नाटक सीमाभाग गाठला. तासगावजवळच्या सावळज या गावातील अंकुश सोनटक्के यांच्याकडे त्यांनी चौंडक वादनाचे शास्त्रीय धडे गिरविले. केवळ वादनच नव्हे; तर हे वाद्य बनविण्याचे प्रशिक्षणही संतोष यांनी घेतले आहे. आता वादनाच्या सरावाबरोबरच त्याच्यात संशोधन करण्याच्या कामात ते व्यग्र आहेत. ‘नादब्रह्माच्या वेडात’ मश्गुल आहेत. खरोखरच असे वेड घेतल्याखेरीज उल्लेखनीय कार्य उभे रहात नाही हे निश्चित!

Leave a Comment