विधान परिषदेवर तटकरे बिनविरोध

sunil-tatkare
मुंबई – कॉंग्रेसतर्फे मोहन जोशींनी विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही, असा निर्धार काँग्रेसकडून चार दिवस कांगावा केला होता पण पक्ष श्रेष्ठींच्या निर्णयानंतर मोहन जोशी यांना अर्ज मागे घ्यावा लागला आणि याचबरोबर सुनील तटकरे यांची बिनविरोध निवड झाली.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या एका जागेवरून चार दिवस चांगलीच जुंपल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यात आज सकाळी चर्चा झाली. त्यानंतर काँग्रेसने माघार घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, या ठिकाणीही राष्ट्रवादीनेच बाजी मारली असून, आगामी जागावाटपातही अशीच बाजी मारणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

21 ऑगस्टला शिवसेनेचे विनायक राऊत यांच्या राजीनाम्यामुळे रिकामी झालेल्या जागेकरिता ही निवडणूक होत असून अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख व वेळ आज दुपारी तीनपर्यंत होती. काँग्रेसने मोहन जोशींना उमेदवारी दिली होती. त्याच वेळी काँग्रेसने अर्ज भरताना विश्वासात न घेतल्यामुळे आम्ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली. विधानसभेतील संख्याबळाचा विचार करता ही जागा काँग्रेसच्या वाट्याची असली तरी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना विधान परिषदेत पाठविण्याचा निर्णय घेतला होता.

Leave a Comment