नोटेवरील गांधीच्या फोटोबाबत सरकार अनभिज्ञ

note
मुंबई – भारतीय राष्ट्रीय प्रतीकामध्ये राष्ट्रपिता म. गांधी यांचा फोटो ही विशेष ओळख बनली असली तरी म.गांधींचा फोटो चलनांतील नोटांवर कधी पासून आला, कुणाच्या आदेशाने आला याची कोणतीही माहिती केंद्र सरकार अथवा रिझर्व्ह बँकेकडे नाही असे आढळले आहे. माहिती अधिकार कायद्यानुसार नरेंद्र शर्मा यांनी ही माहिती केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेकडे मागितली होती.

म. गांधीचा फोटो राष्ट्रीय प्रतिमेत पूर्वी अंतर्भूत केला गेला नव्हता. ८० च्या दशकात व्यक्ती ऐवजी चार सिंह असलेले चिन्ह हे राष्ट्रीय प्रतीक तसेच अन्य प्रतिकांच्या प्रतिमा चलनी नोटांवर छापल्या जात असत.मात्र ९० च्या दशकात म.गांधीची प्रतिमा असलेल्या नोटा चलनात आल्या. त्या कशा, कुणाच्या आदेशाने आणि नक्की कधीपासून आल्या याची माहिती मात्र मिळत नाही. ती सरकारकडेही नाही तशीच रिझर्व्ह बँकेकडेही नाही.

मिळालेल्या माहितीनुसार १५ जुलै १९९३ ला नोटांवरील वॉटर मार्क भागात बापूंचा फोटो छापण्याची शिफारस रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला केली होती व १५ जुलै १९९५ मध्ये नोटेच्या उजवीकडे गांधीच्या फोटोची शिफारस केंद्राला केली होती. मात्र त्यावर केंद्राने कधी निर्णय घेतला, कोणत्या विभागाने हा निर्णय घेतला, कधी अमलात आणला गेला व कोणत्या तारखेपासून या नोटा चलनात आल्या या संबंधातली कोणतीही माहिती मिळत नसल्याचे शर्मा यांनी सांगितले. कोणत्या विभागाने हा निर्णय घेतला, त्यावेळी कोणते अधिकारी होते याचीही माहिती शर्मा यांना मिळालेली नाही.

Leave a Comment