उद्धव ठाकरेंनी केली सरसंघचालकांची पाठराखण

uddhav
मुंबई – शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक भारतीय हिंदू आहे या संघ प्रमुखांच्या वक्तव्यानंतर उठलेल्या वादळात मोहन भागवतांची पाठराखण केली असून माझे स्वर्गीय वडील बाळासाहेब ठाकरे हेसुध्दा अशाच विचारधारेचे होते असे उद्धव म्हणाले.

“जर इंग्लंडमध्ये राहणारा नागरिक इंग्लिश असेल, जर्मनीमध्ये राहणारा नागरिक जर्मन असेल आणि अमेरिकेत राहणारा नागरिक अमेरिकी असेल तर हिंदूस्तानात राहणारा प्रत्येक नागरिक हिंदू का असू शकत नाही?” असे वक्तव्य 10 ऑगस्टला एका भाषणात मोहन भागवत केले होते.

मार्मिक या साप्ताहिकाच्या 54 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात उद्धव यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, मोहन भागवत यांनी जे काही म्हटले आहे, ते सत्य आहे. माझे पिता बाळासाहेब ठाकरेसुध्दा अशाच प्रकारचे विचार मांडायचे. भागवत काय चुकीचे बोलले?

दहिहंडीच्या विषयावर बोलताना उद्धव म्हणाले, की दहीहंडी दरम्यान अल्पवयीन गोविंदांच्या सहभागावर मुंबई उच्च न्यायालयाने आणलेल्या बंदीचे मी समर्थन करतो. मात्र कोणत्याही परिस्थितीत हा उत्सव थांबणार नाही. आगामी विधानसभा निवडणूकीत शिवसेना-भाजप युती सरकारच जिंकणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Leave a Comment