राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत बबनराव पाचपुते

babanrao
मुंबई – आपल्याला आई-बहिणीवरून आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी शिव्या दिल्या. त्यांची तक्रार पक्षाकडे केली तरी पक्षाने दुर्लक्ष केले असल्याचे सांगत श्रीगोंद्याचे आमदार व माजी प्रदेशाध्यक्ष बबनराव पाचपुते यांनी बंडाचा झेंडा उगारला आहे. पक्षातील बडे नेते बबनराव पाचपुते राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत असून, ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधात जनमत असल्याचे दिसून येताच या पक्षातील अनेक नेते पक्षातून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत आहेत. विशेषत विधानसभा निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगलेच खिंडार पडण्याची भीती आहे. दरम्यान, जागावाटपाचा राजकीय पेच निर्माण झाल्यानंतर पक्षातील गळती कशी रोखायची यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक बडे नेते नाराज असून सांगली, नगर, ठाणे परिसरातील अनेक नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. सांगलीतील विलास जगताप, अजित घोरपडे यांच्यासह अनेकांनी पक्षाला टाटा केला आहे. आता श्रीगोंद्यातील पक्षातील बडे नेते बबनराव पाचपुते यांनी अजित पवार व मधुकर पिचड यांच्यावर हल्लाबोल करीत नाराजी व्यक्त केली आहे. आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी आपल्याला आई-बहिणीवरून फोनवर शिव्या दिल्याचे त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. तसेच याबाबत अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे तक्रार केली तरी बघतो, पाहतो अशी उत्तरे दिली गेली.

Leave a Comment