महालक्ष्मी मंदिर; अन्न व औषध प्रशासनाने घेतले लाडूचे नमुने

mahalaxmi
कोल्हापूर – अन्न व औषध प्रशासन खात्याने प्रसिद्ध श्री महालक्ष्मी मंदिरात भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात येणार्‍या लाडवांचा दर्जा तपासण्याची मोहीम हाती घेतली असून, प्रशासनाने तपासणीसाठी या मंदिरातील प्रसादाचे नमुनेही ताब्यात घेतले आहेत. १५ दिवसांनंतर तपासणी अहवाल प्राप्त होणार असून त्यानंतरच महालक्ष्मी मंदिरातील प्रसादाचा दर्जा समजू शकणार आहे.

लोकशक्ती सामाजिक संघटनेने या मंदिरातील लाडू निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या आधारावर प्रशासनाने ही कारवाई हाती घेतली आहे. या दरम्यान अधिकार्‍यांनी सुवासिनी बचत गटाच्या लाडू उत्पादन केंद्राचीही पाहणी करून लाडू तयार करण्यासाठी वापरल्या जाणारी विविध पिठे, डाळी, तेल आदी वस्तूंचीही पाहणी केली. सुवासिनी बचत गटाला देण्यात आलेला परवाना व कंत्राटाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

गेल्या दोन वर्षांत महालक्ष्मीचा प्रसाद म्हणून देण्यात येणार्‍या लाडूंच्या दर्जावरून अनेक वाद झाले आहेत. लाडू तयार करण्याचे कंत्राट कुणाला द्यायचे, यासाठी आंदोलनेही झाली आहेत.

Leave a Comment