निर्बंधाच्या ‘दहीहंडी’ला आव्हाड यांचे आव्हान

jitendra
मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने दहीहंडी उत्सव साजरा करताना अनेक बालगोविंद जखमी व मृत्यूमुखी पडल्याने बालगोविंदा व धोकादायक धर लावण्याला बंदी घातल्याने या निर्णयाला आव्हान देत राष्ट्रवादीचे नेते व वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाडांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतर आव्हाड यांनी त्यावेळीच नापसंती दर्शिवली होती. त्यानुसार त्यांनी आज आव्हान दिले आहे.

दहीहंडी उत्सव हा मागील काही काळापासून सण न राहता तो एक मेगा इव्हेंट झाला असून याचा वापर राजकीय व सामाजिक पातळीवर फायद्यासाठी केला जात होता. याचमुळे वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी 1 लाखांपासून ते 25-50 लाख रूपयांची बक्षिसे ठेवली जात असत. अशी भलीमोठी बक्षिसे जिंकण्यासाठी हजारो युवक गोविंदा बनून या उत्सवात सहभागी होत होते. मात्र, याचकाळात काही दुर्देवी घटना घडल्या. अनेक बालगोविंद मृत्यूमुखी पडले होते तर काही जखमी होत असत. काहींना कायमचे अपंगत्व आलेले आहे. या जीवघेण्या स्पर्धेच्या व मेगा इव्हेंट दहीहंडी साजरी करण्याच्याविरोधात काही जाणकार मंडळींनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर सोमवारी सुनावणी झाली व हायकोर्टाने 18 वर्षाखालील गोविंदांना बंदी घालत धोकादायक ठरणारे चारपेक्षा थर लावण्यास विरोध केला.

मात्र, यावर काही गोविंदा पथकांनी नाराजी व्यक्त केली, तर काँग्रेससह शिवसेनेने याचे स्वागत केले व न्यायालयाने घातलेली बंदी योग्यच असल्याचे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. मात्र, या निर्णयावर राष्ट्रवादीचे नेते व मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच आपण उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार त्यांनी आज आव्हान दिले आहे.

Leave a Comment