देहदान अभियान – आमदार निरूत्साही

suresh
मुंबई – देहदानाबाबत सर्वसामान्यात जागृती व्हावी यासाठी प्रथम राज्यातील आमदारांनी पुढे यावे यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. मात्र या अभियानाला आमदारांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले आहे. वर्षापूर्वी सुरू झालेल्या या अभियानात आत्तापर्यंत केवळ १२ आमदारांनी देहदानाचे अर्ज संबंधितांनी जमा केले असल्याचे समजते.

गतवर्षी विधानसभेच्या पावसाळी सत्रात आरोग्यमंत्री सतीश शेट्टी यांनी देहदान अभियान सुरू केल्याची घोषणा केली. त्यावेळी त्यांनी आणि विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख या दोघांनीच अर्ज दाखल केले. त्यावेळी २५३ जणांनी शपथपत्र दिले त्यातील २०८ आमदार होते. मात्र देहदानाचा अर्ज भरताना नातेवाईकांचीही संमती लागते. त्यामुळे अनेकांनी अर्ज भरले मात्र ते दाखल केलेच नाहीत. दोन्ही सभागृहात मिळून ३५३ आमदार आहेत. त्यापैकी केवळ १२ जणांनीच आपले देहदानाचे अर्ज दाखल केले आहेत.

या संदर्भात आरोग्यमंत्री शेट्टी म्हणाले की देहदानाबाबत अजून नागरिकांत पुरेशी जागृती झालेली नाही. धार्मिक कारणांमुळेही देहदान करण्याची लोकांची तयारी नसते. मात्र जनजागृती करायची असेल तर प्रथम लोकप्रतिनिधींनीच पुढे यायला हवे. दुर्देवाने अजूनही पुढे येण्याची लोकप्रतिनिधींची तयारी नसल्याचेच दिसून येत आहे. आरोग्यमंत्र्यांच्या सर्व कुटुंबाने देहदानाचे अर्ज दाखल केले आहेत. त्याचबरोबर रणजित कांबळे, चंद्रकांत पाटील, जयप्रकाश छाजेड, अनिल भोसले, अनिल गोटे, अनिल परब, अनिल ठाकरे,विद्या चव्हाण, अमरनाथ राजुरकर, सुरेश देखमुख, संजय कुटे यांनीही अर्ज दाखल केले आहेत.

देशात तमीळनाडूनंतर देहदानाचा संकल्प करणार्‍या राज्यात महाराष्ट्राचा नंबर आहे. देशात देहदानाचा अर्ज भरणार्‍यांचे प्रमाण लाखास ०.६ इतकेच असून पाश्चिमात्य देशात हेच प्रमाण ३० टक्के इतके आहे.

Leave a Comment