टाटांची नवी झेस्ट सेदान सादर

zest
टाटा मोटर्सने मंगळवारी झेस्ट ही कॉम्पॅक्ट सेदान श्रेणीतील कार भारतीय बाजारात सादर केली. या कारच्या पेट्रोल व्हर्जनच्या किमती ४.६४ लाखांपासून तर डिझेल व्हर्जनच्या किमती ५.६४ लाखांपासून आहेत. चार वर्षांच्या कालावधीनंतर टाटा मोटर्सने त्यांचे हे प्रवासी वाहन सादर केले असल्याचे टाटा मोटर्सच्या प्रवासी कार विभागाचे अध्यक्ष रणजित यादव यांनी सांगितले.

ही कार जागतिक ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन बनविली गेली आहे आणि भारताप्रमाणेच युके, इटली, कोरिया येथील अभियंत्यांचे सहाय्यही त्यासाठी घेण्यात आले आहे. देशातील टाटांच्या ४७० प्रवासी कार विक्री केंद्रावर झेस्ट उपलब्ध करून दिली गेली आहे. या कारच्या खरेदीदारांसाठी कंपनीने कांही सवलती जाहीर केल्या आहेत. त्यानुसार तीन वर्षे किवा १ लाख किमी वॉरंटी, ३ वर्षे अथवा ४५ हजार किमी वार्षिक मेंटेनन्स करार, ३ वर्षे मोफत सर्व्हीसिंग असे त्यांचे स्वरूप आहे.

ही कार कंपनीच्या पुणे आणि रांजणगांव प्रकल्पात तयार करण्यात आली असून पेट्रोल व्हर्जनसाठी भारतात प्रथमच मल्टी पॉईंट फ्यूएल इंजेक्शन पेट्रोल इंजिनचा वापर करण्यात आला आहे. पेट्रोल व्हर्जन लिटरला १७.६ तर डिझेल व्हर्जन लिटरला २३ किमी अॅव्हरेज देणार आहे. या पाठोपाठ कंपनी त्यांची बोल्ट ही कारही बाजारात आणत असून दरवर्षी दोन नवीन वाहने कंपनी सादर करणार आहे.

Leave a Comment