पुणे पोलिस शोधत असलेला आरोपी तुरुंगातच सापडला

yerawada
पुणे – गेली दोन वर्षे पुणे पोलिस राज्याबरोबरच बाहेरच्या राज्यातही ज्याचा शोध घेत आहेत तो अट्टल गुन्हेगार पुण्याच्या येरवडा कारागृहातच असल्याचे आढळून आले असून त्यामुळे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. दाभोळकर यांचे मारेकरी न सापडल्याने पुणे पोलिस टीकेचे लक्ष्य बनले होते. त्यातच आता या नवीन प्रकरणाची भर पडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मण उर्फ लख्या अण्णा जाधव याच्यावर खूनाचा प्रयत्न, अपहरण, लूट असे डझनभर गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुन्हा करून दुसर्‍या राज्यात पलायन करायचे अशी त्याची पद्धत आहे. एका गुन्ह्यासंदर्भात पुणे पोलिसांना तो हवा असल्याने गेली दोन वर्षे पोलिस त्याचा राज्यात तसेच बाहेरच्या राज्यातही तपास करत आहेत.

जुलै महिन्यात शिरूर पोलिसांनी वाहनचोरी प्रकरणी एकाला अटक केली. त्याने आपले नांव संतोष कलशेट्टी असे सांगितले होते. त्याला २ ऑगस्टला न्यायालयीन कोठडीही दिली गेली. दरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाला लख्या शिरूर शिक्रापूर भागात वाहनचोर्‍या करत असल्याची खबर मिळाली. तेव्हा पुणे पोलिसांनी शिरूर येथे जाऊन वाहनचोरी प्रकरणी पकडण्यात आलेल्या गुन्हेगारांची माहिती घेऊन फोटो पाहिले तेव्हा संतोष कलशेट्टी म्हणजेच लख्या असल्याचे त्यांना आढळले. त्यानंतर पोलिसांनी न्यायालयात त्याला हजर करून पोलिस कोठडी मागितली असल्याचे समजते.

Leave a Comment