अजित पवारांना वहाणेचा प्रसाद

ajit
नागपूर – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्या महिलेने स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी चप्पल भिरकाविल्याची घटना काल दुपारी गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशी येथे घडली. चप्पल अजितदादांना लागली नाही मात्र परिस्थिती गंभीर बनल्याने पोलिसांनी तातडीने चप्पल फेकणार्‍या कार्यकर्त्या शोभा मस्की आणि त्यांच्या गटाला ताब्यात घेतले असे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार येथील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी आले होते. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीबद्दल बोलताना त्यांनी विदर्भातील लोकांची तशी मागणी नसल्याचे व त्यासंदर्भातल्या जनमत चाचण्यांना कांही अर्थ नसल्याचे विधान केले. जय महाराष्ट्र म्हणून त्यांनी भाषण संपविले त्याचवेळी श्रेात्यांमधून जय विदर्भ आणि विदर्भ वेगळा करा अशा आरोळ्या उठल्या. राजूर येथील कार्यकर्त्या शोभा मस्की यांनी याचवेळी पायातील चप्पल काढून पवारांच्या दिशेने भिरकावली. मात्र गर्दीमळे ती त्यांच्यापर्यंत पोहोचू शकली नाही. या घटनेने एकच खळबळ उडाली.

या निर्धार मेळाव्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, गृहमंत्री आर.आर. पाटील, व राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते. झाल्या घटनेबद्दल अजित पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला असल्याचेही समजते.

Leave a Comment