नोकिया १३० स्मार्टफोन १५५५ रूपयांत

nokia
मायक्रोसॉफट नोकियाने त्यांच्या नवीन अल्ट्रा लो बजेट स्मार्टफोन नोकिया १३० ची घोषणा केली असून कंपनीच्या साईटवरून हे स्मार्टफोन लवकरच जगाच्या बाजारपेठेत आणले जात असल्याचे सूचित केले आहे. विशेष म्हणजे सहज परवडणार्‍या किमतीतील हे स्मार्टफोन ३६ तासाच्या बॅटरी बॅकअप सह उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

खास प्रवासी वर्गाला नजरेसमोर ठेवून हे फोन बाजारात आणले जाणार आहेत. व्हिडीओ प्लेअर व म्युझिक सिस्टीमसह असलेले हे फोन केवळ १९ युरो म्हणजे १५५५ रूपयांत ग्राहकांना मिळू शकणार आहेत. ३६ तासाच्या बॅटरी बॅकअपमुळे दीर्घकाळ संगीत अथवा व्हिडीओ पाहणे ग्राहकाला शक्य होणार असून प्रामुख्याने सतत प्रवास कराव्या लागणार्‍या ग्राहकांना ते अधिक उपयुक्त ठरतील असा कंपनीचा दावा आहे.

१.८ इंची स्क्रीन असलेल्या या फोनवर एफएम रेडिओची सुविधा आहे तसेच मायक्रो कार्डच्या सहाय्याने फोनची मेमरी ३२ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे. या वर्षीच्या नोव्हेंबर डिसेंबर मध्ये नोकिया १३० बाजारात येण्याची शक्यता असून भारत, इजिप्त, चीन, इंडोनेशिया, पाकिस्तान, नायजेरिया आणि व्हीएतमाम या देशांत ते उपलब्ध करून दिले जाणार आहेत.