सलग ७४० दिवस अणुवीज निर्मिती करून अमेरिकेचे रेकॉर्ड तोडले

rawatpadaराजस्थानातील रावतभाटा अणुवीज प्रकल्पाने सतत ७४० दिवस वीज निर्मिती करून अमेरिकेचे अणुवीज निर्मितीचे रेकॉर्ड मोडले आहे. सोमवारी रावतभाटा प्रकल्पाने अमेरिकेच्या लास्ले लाईट वॉटर रिअॅक्टरचे रेकॉर्ड मोडून नवीन विक्रम प्रस्थापित केला. विशेष म्हणजे १९७४ साली अमेरिकेने भारताला अणुवीज उत्पादनाचे तंत्रज्ञान देण्यास नकार दिला होता.

१९७४ मध्ये राजस्थानातील पोखरण येथे अणुचाचण्या घेतल्यानंतर रावतभाटा येथे सुरू असलेल्या अणुवीज निर्मितीचा प्रकल्प अर्धवट सोडून कॅनडाचे इंजिनिअर मायदेशी परतले होते. त्यानंतर कॅनडा व अमेरिका या दोन्ही देशांनी हे तंत्रज्ञान भारतात पुरविण्यास नकार दिला होता. मात्र अर्धवट प्रकल्पाचे आव्हान भारतीय अभियंत्यांनी स्वीकारले आणि यशस्वीरित्या ते पुरेही केले. त्यानंतर २ ऑगस्ट २०१२ रोजी या प्रकल्पाच्या पाचव्या टप्प्यातून अणुवीज निर्मितीला सुरवात करण्यात आली असे स्टेशन प्रमुख विनोदकुमार यांनी सांगितले.

सुरवातीला सतत १ वर्ष सलग वीजनिर्मिती यशस्वीपणे केल्यानंतर आमचा उत्साह वाढला असे सांगून विनोदकुमार म्हणाले की त्यानंतर आम्ही ५३९ दिवस सतत निर्मितीचे लक्ष्य ठेवले. तेही पूर्ण झाल्यावर दोन वर्षे सलग निर्मिती केली आणि आता अमेरिकेचे ७३९ दिवसांचे रेकॉर्ड मोडून ७४० दिवस सतत वीजनिर्मिती केली आहे. या प्रकल्पातून दररोज १.८० कोटी रूपये किमतीची वीज तयार होत आहे. आत्तापर्यंत १३३०.२० कोटी रूपये किमतीची वीज निर्मिती झाली असून प्रकल्पासाठी १२०० कोटी रूपये गुंतवणूक केली गेली होती.

Leave a Comment