विलासराव यांचे स्मारक नव्या पिढीला सतत प्रेरणा देईल- चव्हाण

cm1
लातूर : राज्याच्या इतिहासातील राजकीय व वित्तीय दृष्टीने कसोटीच्या कालखंडात विलासराव देशमुख यांनी राज्याला भक्कम नेतृत्व दिले. त्यांचे स्मारक नव्या पिढीला सतत प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

आपल्या भाषणात मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले की, पुतळ्याचे अनावरण आणि स्मृती संग्रहालयाचे उद्घाटन हा भावपूर्ण आठवणी जागवणारा कार्यक्रम आहे. विलासरावांच्या निधनानंतर दोन वर्षे उलटली आहेत, यावर विश्वास बसत नाही. त्यांनी मराठवाडा विभागाला विकास प्रक्रियेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कामाचा डोंगर उभा केला. लातूर जिल्ह्यातील सहकारी संस्था शिस्तीने चालविल्या. मराठवाड्याची पाण्याची तहान भागविण्यासाठी विविध प्रकल्पांना आकार दिला. हे सर्व करताना राज्याच्या अन्य भागातील विकास प्रकल्पांनाही गती दिली. मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर व्हावे यासाठी ध्यास घेत विविध विकास कामांना चालना दिली.

लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील निवाडा येथील रेणा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात विलासराव देशमुख यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला असून त्यांच्या आठवणी जागविणारे एक स्मृती संग्रहालयही उभारण्यात आले आहे. या पुतळ्याचे अनावरण आणि स्मृती संग्रहालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते आज झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील-चाकूरकर हे होते. यावेळी व्यासपीठावर लातूरचे पालकमंत्री सतेज पाटील, राज्याचे परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री अमित देशमुख, ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर, आमदार सर्वश्री माणिकराव ठाकरे, दिलीपराव देशमुख, सतीश चव्हाण, विक्रम काळे, वैजनाथ शिंदे, बाबासाहेब पाटील, बसवराज पाटील, ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, लातूरच्या महापौर स्मिता खानापूरे, श्री.उल्हास पवार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष एस.आर.देशमुख, डॉ.अर्चना पाटील यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी व पदाधिकारी तसेच श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्यासह देशमुख परिवारातील विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Leave a Comment