मीना – सौदीतील तंबूंचे शहर

meena
मुस्लीम बांधवांचे पवित्र यात्रास्थळ मकका येथून अगदी जवळ असलेले पश्चिम सौदी अरेबियातील मीना शहर तंबूंचे शहर म्हणून प्रसिद्धीस आले आहे. पवित्र मककेपासून केवळ ८ किमीवर असणार्‍या या डोंगराळ छोट्याशा शहरात लक्षावधी तंबू आहेत. त्यातील १ लाखाहून अधिक तंबू एअरकंडिशण्ड आहेत आणि ते फायरप्रूफ फायबर ग्लासपासून बनविले गेले आहेत.

मक्केची यात्रा ही प्रत्येक मुस्लीमाचे स्वप्न असते. या हज यात्रेसाठी जगभरातून दरवर्ष लाखोंच्या संख्येने मुस्लीम येत असतात. पूर्वी हे यात्रेकरू आपापले तंबू घेऊन येत व जाताना ते परत घेऊन जात. नंतर सौदी सरकारने ९० च्या दशकांत स्वतः कापडी तंबू पुरविण्याची सुरवात केली. मात्र १९९७ साली लागलेल्या भीषण आगीत अनेक तंबू जळाले आणि ३५० यात्रेकरूंना होरपळून मरण आले. तेव्हा हे तंबू बंद करून नवीन प्रकारचे फायरप्रूफ तंबू तयार करण्यात आले.

मीना शहरात जेथे पाहाल तेथे हे तंबू दिसतात. ८ बाय ८ च्या तंबूत यात्रेकरूंची राहण्याची व्यवस्था आहे. येथे एकूण ३० लाख यात्रेकरूंची सोय होते. या तंबूचे कॅम्प तयार केले असून ते भिंतींनी विभागले गेले आहेत. प्रत्येक कॅम्पमध्ये स्वयंपाकघर, बाथरूम्सची व्यवस्था केली जाते आणि प्रत्येक कॅ म्पला देशांप्रमाणे कलरकोड दिला गेला आहे तसेच नंबरही दिले गेले आहेत. संबंधित देशांच्या यात्रेकरूंना त्याच रंगाचे पास दिले जातात व नंबरही दिला जातो. यामुळे गर्दीत कोणी हरवलाच तर त्याचा शोध घेणे सुलभ होते.

Leave a Comment