भारत रत्नचा वाद

bharatrtna
यावर्षी भारत रत्न किताब वादग्रस्त ठरणार आहे असे दिसत आहे. कारण सुभाषचंद्र बोस यांना तो द्यावा असा सरकारचा विचार दिसत आहे. सुभाषचंद्र बोस यांना दुसर्‍या महायुद्धाच्या काळात झालेला अपघात आणि त्यांचा मृत्यू यांना अजूनही दुजोरा मिळत नाही. ते अजूनही हयात आहेत असे काही लोकांचे म्हणणे असते. भारतीय जनता पार्टीनेही या संशयाला दुजोरा दिलेला आहे. त्यामुळे ज्यांच्या मृत्यूविषयी हे सरकार साशंक आहे त्यांना हा किताब देते कशाला, असा सवाल नेताजींच्या वंशजांनी केला आहे. खरे म्हणजे या प्रश्‍नात काही अर्थ नाही. नेताजींना भारत रत्न किताब देण्याशी त्यांच्या हयात असण्याच्या वादाचा काहीही संबंध नाही. सरकारने हा किताब देताना मरणोत्तर असे म्हटले तर हा वाद येतो. अजून सरकारने तशी काही घोषणा केलेली नाही. त्यामुळे कोणीही वाद घालावा याला काही औचित्य नाही. खरे म्हणजे हा किताब सन्मानाने दिला गेला पाहिजे. परंतु जेव्हा राजकीय क्षेत्रातल्या व्यक्तीला हा किताब देण्याची सूचना पुढे येते तेव्हा त्यावर कसला ना कसला वाद निर्माण होतोच.

सध्या भारत रत्न किताबाची चर्चा सुरू झालेली आहे. अजून सरकारने तशी घोषणा केलेली नाही, परंतु माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनाही हा किताब मिळण्याची शक्यता दिसत आहे. सचिन तेंडुलकर याला हा किताब देण्यात आला तेव्हा एक वाद निर्माण झाला होता. एखाद्या व्यक्तीला फार कमी वयात एवढा मोठा सन्मान द्यावा की नाही यावर विचार झाला होता. आज आपण त्याला असा काही किताब दिला आणि नंतर त्याचा पाय घसरला तर तो किताब बदनाम होणार. म्हणून थोडा उतार वयात तो दिला जायला हवा होता. सैफ अली खान याला पद्मश्री किताब देण्यात आला आणि तो आता मारामारीच्या प्रकरणात गुंतला आहे. त्याचा तो किताब आता मागे घेण्यात यावा अशी सूचना पुढे आली आहे. खरे तर असेच एक महाराष्ट्रातले पद्मश्री लक्ष्मण माने हेही बलात्काराच्या प्रकरणातले आरोपी आहेत. त्यांच्याबाबतीतही असा विचार होऊ शकतो. हे किताब कोणाला द्यावेत आणि कोणाला नाही याचा फार तारतम्याने विचार होत नसावा असे एकुण चित्र आहे. सचिन तेंडुलकरला भारत रत्न देताना असाच विचार झाला आहेे. तो लोकप्रिय आहे पण मनमोहनसिंग त्याला भारत रत्न द्यायला फार राजी नव्हते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांंना सचिनला भारत रत्न देण्याचे राजकीय महत्त्व सांगितले आणि मग तसा निर्णय झाला असे सांगितले जात आहे. कॉंग्रेसने नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांना हा किताब दिला आहे. नंतर जनता दलाच्या सरकारने डॉ. आंबेडकरांना हा किताब दिला.

राजीव गांधी यांच्या आधी अटल बिहारी वाजपेयी यांना हा किताब दिला जायला हवा होता पण कॉंग्रेस सरकारने हा किताब नेहमी राजकारणासाठी वापरला. आता मात्र मोदी सरकारने वाजपेयी यांना हा किताब देण्याचा निर्णय घेतला आहे. वाजपेयींच्या व्यक्तिमत्त्वाचे एक वैशिष्ट्य असे की, ते पन्नास वर्षे विरोधी नेते म्हणून काम करीत राहिले. ते विरोधी पक्षाचे नेते म्हणून संसदेत काम करीत होते तेव्हाचे सत्ताधारीही त्यांचा आदर करीत असत. ते सत्ताधारी झाले तेव्हा त्यांना विरोधी पक्षांनीही तसाच आदर दिला. एवढा काळ राजकारणात असतानाही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा किंवा गैरवर्तनाचा एकही आरोप लागला नाही. ते रायगडावर आले तेव्हा तिथल्या तुळजाभवानीच्या दर्शनासाठी मंदिरात गेले. मात्र त्यांच्या खिशात देवीसमोर टाकायला एकही पैसा नव्हता. कारण त्यांनी पैशासाठी राजकारण कधी केलेेले नाही. त्यांच्या चिंतनात आणि विचारात नेहमी देशच असतो. ते इंदिरा गांधी यांच्यावर टीका करीत असत पण ते जेव्हा जर्मनीत गेले तेव्हा त्यांना पत्रकारांनी इंदिरा गांधी यांच्या विषयी बोलण्यास सांगितले तेव्हा त्यांनी इंदिरा गांधी यांची प्रशंसा केली आणि सर्वांना चकित केले.

पत्रकारांनी त्यांना भारतात ते करीत असलेल्या टीकेबाबत विचारले तेव्हा वाजपेयी म्हणाले. मी भारतात त्यांचा विरोधक आहे. एकदा देशा सोडून बाहेर आलो की आम्ही एक आहोत. त्यांनी देशाच्या राजकीय अस्थिरतेच्या काळात फार मोठे काम केले आहे. आपल्या देशात १९८९ ते १९९९ या काळात राजकीय अस्थिरता होती. चार वर्षात चार सरकारे येऊन गेली होती. लोकांचा लोकशाहीवरचा विश्‍वास उडण्याची वेळ आली होती. कॉंग्रेसशिवाय अन्य कोणताही पक्ष केन्द्रात स्थिर सरकार देऊ शकणार नाही असा डंका कॉंग्रेसचे नेते पिटत होते. तेव्हा वाजपेयी यांनी २३ पक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सहा वर्षे चालवून दाखवले आणि अनेक पक्षांची आघाडी यशस्वीरित्या कशी चालवावी हे दाखवून दिले. कॉंग्रेसशिवाय अन्य पक्ष स्थिर सरकार देऊ शकतात हे त्यांनी दाखवून दिले. त्यामुळे त्या अस्थिरतेच्या काळातही लोकांचा लोकशाहीवरचा विश्‍वास दृढ झाला. एक उदारमतवादी नेता म्हणून त्यांची ख्याती आहेच पण ते अजोड वक्ते आहेत. त्यांनी आपल्या जीवनाचा क्षण आणि क्षण देशासाठी वेचलेला आहेे. त्यांच्या सोबत कांशीराम यांनाही भारत रत्न देण्याचा विचार सुरू आहे. त्यात काही प्रमाणात राजकारण आहे. सुभाषचंद्र बोस यांनाही हा किताब देण्याचा विचार सुरू आहेे. त्यातही कॉंग्रेस पक्षाला खिजवण्याचा हेतू असलेला लपत नाही.

Leave a Comment