जोगेश्वरी येथे आणखी एका गोविंदाचा मृत्यू

dahihandi
मुंबई – बालगोविंदाचा नवी मुंबई परिसरात मृत्यूची घटना ताजी असतानाच आणखी एका गोविंदाचा जोगेश्वरीच्या बेहरामबाग गणेश नगर येथे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

शनिवारी रात्री सरावावरून गणेश नगर येथील ओमसाई मित्रमंडळातील ऋषीकेश पाटील (वय १८) हा घरी परतल्यावर त्याला चक्कर आली होती. कुटुंबीयांनी त्याला जवळच्या कूपर रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. थरांची मर्यादा आणि बालगोविंदांचा सहभाग याबाबत न्यायालय आणि पोलिस प्रशासनाकडून विचारणा होत असतानादेखील अनेक गोविंदा पथकांनी सरावादरम्यान त्यांची हेकेखोरी कायम ठेवली आहे. त्यांच्या हेकेखोरीचाच आणखी एक बळी असल्याची भावना जनमानसातून व्यक्त होत आहे.

दहीहंडीमध्ये १२ वर्षाखालील मुलांच्या सहभागावर बंदी असतानाही अनेक ठिकाणी लहान मुलांना थरांवर चढवले जात असल्याचे समोर येत आहे. याबद्दल हळहळ व्यक्त होत असतानाच ऋषीकेशच्या मृत्यूची बातमी आली आहे. पाटील कुटुंबीयांवर आभाळ कोसळले असले तरी आभाळाला हात लावणारे थर रचण्याचा गोविंदा पथकांचा अट्टाहास अजूनही सुरू आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष वेळे यांनी दिली आहे.

Leave a Comment