बंडोबा राणेंना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची लालूच

rane
मुंबई – औट घटकेचे मुख्यमंत्रीपद कशाला घेता, त्यापेक्षा आगामी विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणा आणि दीर्घकाळ मुख्यमंत्रीपदाचा उपभोग घ्या अशी समजूत घालून काँग्रेसचे बंडखोर नेते नारायण राणे यांना दिल्ली दरबारी वाटाण्याच्या अक्षता दिल्या गेल्या असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. हायकमांडने राणे यांना भेटीसाठी वेळ देऊन त्यांचे म्हणणे एकून घेण्याची हुषारी दाखविली व त्याचबरोबर मुख्यमंत्रीपदाचे गाजर पुढे करून त्यांचे बंड थंड करण्यात यश मिळविले आहे आणि ही कामगिरी प्रभारी मोहन प्रकाश आणि अहमद पटेल यांनी पार पाडली असेही समजते.

लोकसभेत मुलाचा पराभव झाल्यामुळे अतिशय व्यथीत झालेल्या राणे यांनी राज्यातील नेतृत्त्व बदलावे यासाठी आकांत मांडला होता. मुख्यमंत्री बदलले गेले नाहीत तर लोकसभा पराभवापेक्षाही दारूण पराभवास विधानसभेत सामोरे जावे लागेल असेही ते वारंवार सांगत होते. उद्योगमंत्रीपदाचा राजीनामा त्यांनी दिला होता मात्र काँग्रेस सोडली नव्हती. त्यामागे अन्य कोणत्याही पक्षाने त्यांना आपल्यात समावून घेण्यास दाखविलेली अनुत्सुकता हेही एक कारण होते असेही सांगितले जात आहे. मात्र राणेंनी राजीनामा देताना शिवसेना सोडून पक्षात आल्यास सहा महिन्यात मुख्यमंत्रीपद देण्याचे वचन कॉग्रेसने नऊ वर्षे लोटूनही पाळले नसल्याचे कारण दिले होते.

राणे यांनी काँग्रेस पदश्रेष्ठींसमोर चांगलीच डोकेदुखी निर्माण केली होती. मात्र आगामी निवडणुकांत काँग्रेस सत्तेवर येऊ शकणार नाही याची पुरेशी जाणीव पक्षश्रेष्ठींनाही झाली असल्याने राणेंची समजूत काढण्याचा हा मार्ग काढण्यात आला. राज्यात पुन्हा काँग्रेसला बहुमत मिळवून द्या आणि मुख्यमंत्री व्हा असा पर्याय राणेंना दिला गेला आणि अन्य कांही उपाय नसल्याने राणेंनाही हे आव्हान स्वीकारावे लागले असे अंतर्गत सूत्रांचे म्हणणे आहे.

Leave a Comment