अमेरिकेचे इराकवर हवाई हल्ले सुरू – ५० अतिरेकी ठार

us
अमेरिकेच्या एफ ए १८ लढावू विमानांनी शुक्रवारी इराकमधील इर्बिल भागात इस्लमिक स्टेटच्या दहशतवाद्यांची इर्बिल शहराकडे सुरू असलेली वाटचाल रोखण्यासाठी ५०० पौंड वजनाचे लेझर गायडेड बॉम्ब टाकले. या हल्ल्यात इस्लामिक स्टेटचे किमान ५० दहशतवादी ठार तर ६० हून अधिक जखमी झाल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. इर्बिलच्या संरक्षणासाठी लढत असलेल्या कुर्दिश पथकांवर तोफगोळ्याचा मारा इस्लामिक स्टेट दहशतवाद्यांकडून सुरू होता. कुर्दिश पथकांना मदत म्हणून हे हल्ले केले जात असल्याचे पेंटागॉनचे प्रेस सेक्रेटरी रिअर अॅडमिरल जॉन किर्बे यांनी जाहीर केले. हे हल्ले प्रामुख्याने दहशतवाद्यांच्या तोफगोळा पथकांवर केले गेले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी गुरूवारी रात्री देशाला संदेश देताना अमेरिकन दूतावास आणि अमेरिकन अधिकारी असलेल्या इर्बिल व बगदाद मध्ये इस्लामिक स्टेटचे दहशतवादी प्रवेश करू पाहतील तर हवाई हल्ले करण्याचे आदेश दिले गेले असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार हे हल्ले सुरू झाले आहेत. मात्र अमेरिका प्रत्यक्ष युद्धात सैनिक पाठविणार नाही असेही ओबामा यांनी सांगितले आहे. अमेरिका केवळ कुर्दिश पथकांना आणि इराक सरकारला दहशतवाद विरोधी लढ्यात सहकार्य म्हणून हवाई हल्ले करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

Leave a Comment