टीम इंडियाचे शेर 152 धावांत ढेर

team-india
मँचेस्टर – घरच्या मैदानावर खोर्‍याने धावा काढून जगभर तोर्‍यात मिरवणार्‍या टीम इंडियाच्या फलंदाजांचे गुरुवारी पितळ उघडे पडले. मँचेस्टर कसोटीत इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांपुढे भारतीय फलंदाजांनी नांग्या टाकताना 152 धावांत गाशा गुंडाळला. प्रत्युत्तरात यजमान इंग्लंडने पहिल्या दिवसअखेर 3 बाद 113 धावा काढल्या. अद्याप 39 धावांनी पिछाडीवर असलेल्या इंग्लंडकडे सात विकेट शिल्लक आहेत. संघाचे इयान बेल (45) व जॉर्डन (0) मैदानावर खेळत आहेत.

स्टुअर्ट ब्रॉडने 25 धावांच्या मोबदल्यात 6 बळी घेत भारताचा डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. धोनी व अश्विन यांनी सातव्या विकेटसाठी केलेली 74 धावांची भागीदारी भारताच्या डावातील सर्वात मोठी भागीदारी ठरली. भारताच्या डावात 6 फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. एका डावात खाते उघडण्यात अपयशी ठरलेल्या फलंदाजांच्या संख्येचा विचार करता, भारताने आज या अनोख्या विश्वविक्रमाची बरोबरी केली.

भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर नाणोफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. पण आघाडीच्या फलंदाजांना त्याचा लाभ घेता आला नाही. जेम्स अॅन्डरसन व स्टुअर्ट ब्रॉड यांनी सुरुवातीला 5.1 षटकांत केवळ 8 धावांच्या मोबदल्यात 4 फलंदाजांना माघारी परतवत भारताचा डाव अडचणीत आणला. जवळजवळ दीड वर्षाच्या कालावधीनंतर कसोटी सामना खेळणारा सलामीवीर गौतम गंभीर (4) बाद होणारा पहिला फलंदाज ठरला. ब्रॉडच्या गोलंदाजीवर त्याचा उडालेला ङोल गलीमध्ये तैनात क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावला. मुरली विजय (०), विराट कोहली (०) व चेतेश्वर पुजारा (०) यांना खातेही उघडता आले नाही. अजिंक्य रहाणो (24) व महेंद्रसिंग धोनी यांनी पाचव्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी करीत डाव सावरण्याच्या आशा निर्माण केल्या. जॉर्डनने रहाणेला माघारी परतवत ही भागीदारी संपुष्टात आणली. दुस-या सत्रच्या सुरुवातीला जडेजा (०)माघारी परतला. त्याआधी, सकाळी पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ अर्धा तास उशिरा प्रारंभ झाला.