राहुल गांधी कोणाविरुद्ध आक्रमक?

rahul
कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत जातीय दंगलींवर चर्चा सुरू असताना अचानकपणे आक्रमक रूप धारण केले आणि या देशामध्ये केवळ एकाच माणसाचा आवाज ऐकला जातो, असे सभापतींना सुनावले. राहुल गांधींचा अवतार बघून कॉंग्रेसच्या नेत्यांना हर्षवायू होण्याची पाळी आली. आमचा नेता असा आक्रमक आहेच, पण तो नेहमीनेहमी रागाला येत नाही, असा मोक्यावर रागाला येतो की, भाजपाच्या नेत्यांची बोबडी वळते असे ते म्हणायला लागले. राहुल गांधींच्या या रौद्रावताराचे सर्वांनाच नवल वाटले. कारण गेला आठवडा त्यांच्या लोकसभेत डुलक्या घेण्यावरून गाजला होता. झोपा काढणारे राहुल गांधी झोपेतून उठले आणि सभापतींच्या आसनासमोर धावले तरी कसे, असा प्रश्‍न सर्वांना पडला. कॉंग्रेसच्या नेत्यांना मात्र राहुल गांधींच्या नव्या अवतारामुळे देशामध्ये एक नवे राजकीय पर्व सुरू होणार असाच साक्षात्कार झाला. या सभागृहामध्ये एका व्यक्तीशिवाय दुसर्‍या व्यक्तीचा आवाज ऐकला जात नाही, अशी गंभीर टीका त्यांनी केली. सगळ्यांना बोलू द्या, एकाच व्यक्तीला संधी देऊ नका असे म्हणत त्यांनी सभापतींवर सुद्धा आरोप केला.

ज्या एकाच व्यक्तीचा आवाज ऐकला जातो असे ते म्हणत होते ती एकच व्यक्ती म्हणजे कोण, अर्थात नरेंद्र मोदी. राहुल गांधी पहिल्यांदाच नरेंद्र मोदींना असे लक्ष्य करत होते. यामधली एक गंमत कोणाच्याच लक्षात आली नाही. गेल्याच आठवड्यापर्यंत लोकसभेतले कॉंग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे हे नरेंद्र मोदी संसदेत का येत नाहीत, असा प्रश्‍न उपस्थित केला होता आणि पंतप्रधान मोदी यांच्या अनुपस्थितीबद्दल त्यांनी तक्रार केली होती. मग मोदी जर संसदेत येतच नसतील तर त्यांच्या एकट्याचाच आवाज राहुल गांधींना कुठून ऐकायला येतो, हा प्रश्‍नच आहे. राहुल गांधींना सध्या नरेंद्र मोदी कोठेही असले तरी त्यांचाच आवाज ऐकू येतो असे दिसते. राहुल गांधी एकदा लोकसभेत डुलकी घेताना सापडले. त्यांना डुलकी घ्यायला काही बंदी नाही, परंतु सध्या कॉंग्रेस पक्षाचा सर्वात आवडता विषय म्हणजे महागाई आणि त्या महागाईवर चर्चा सुरू असताना राहुल गांधींचा डोळा लागत होता. आता अशी झोप घेणारे राहुल गांधी एकदम जागे झाले. असा प्रसंग आपल्यावर सुद्धा येतो. खूप गाढ झोप लागलेली असते आणि आपल्या आजूबाजूला कोलाहल सुरू असतो. आपल्या स्वप्नातला विषय आणि त्या कोलाहलातले आवाज यांचे असे काही विचित्र मिश्रण होते की, आवाज ऐकून जागे झाल्यानंतर ते स्वप्न खरे की ते आवाज खरे हेच कळत नाही. राहुल गांधीची अवस्था तशीच झाली आहे.

या देशात केवळ एकाचाच आवाज ऐकला जातो हे पूर्वीचे वाक्य आणि संसदेत त्यांना आलेली जाग यांचे असेच विचित्र मिश्रण झाले. या देशात केवळ एकच आवाज ऐकला जातो हे वाक्य त्यांच्याच पक्षात सोनिया गांधींच्या बाबतीत उच्चारले गेले होते. तेच राहुल गांधींना वापरावेसे वाटले. अर्धवट झोपेत, अर्धवट जागृत अवस्थेत त्यांनी सोनिया गांधींसाठीचे वाक्य नरेंद्र मोदी यांच्यासाठी वापरले. त्यांचे हे वाक्य त्यांनी आपल्या बाकावर बसून हळूच उच्चारले आणि त्यांच्या बाजूला बसलेल्या कॉंग्रेसच्या खासदाराने राहुल गांधींचा हा नवा अवतार बघून ‘वेल’ असा शेरा पास केला. त्या अर्धवट जागृत अवस्थेत राहुल गांधींना वेलचा अर्थ कळलाच नाही. ते आपल्या सभापतींच्या ‘वेल’मध्ये धावत गेले. त्यांच्या मनात वेलवरून निर्माण झालेला संभ्रम बघून राहुल गांधी यांच्या डोक्यात सारे काही आलबेल सुरू नाही हे दाखविणारे आहे. राहुल गांधींचा हा आक्रमक अवतार बघून सगळेच चकित झाले. कॉंग्रेसच्या नेत्यांना तर फारच आनंद झाला. राहुल गांधी आता एकदम आक्रमक होऊन भारतीय जनता पार्टीला सळो की पळो करून सोडतील असे कॉंग्रेसच्या नेत्यांना वाटायला लागले. पण त्यांना या आक्रमकतेमागची खरी मख्खी माहीतच नाही.

राहुल गांधी भाजपाच्या विरोधात आक्रमक झालेले नाहीत तर ते प्रियंका गांधी यांच्या विरुद्ध आक्रमक झालेले आहेत हे त्यांच्या लक्षात आलेले नाही. राहुल गांधी सध्या भाजपाला घाबरत नाहीत. भाजपाचा एक दिवस नक्कीच पराभव होणार आणि आपल्या हातात सत्ता येणार याविषयी ते निर्धास्त आहेत. ते भाजपाच्या विरुद्ध काही करत नाहीत, पण एक ना एक दिवस सत्ता हस्तगत करायची असेल तर आपण कॉंग्रेसचे उपाध्यक्ष असले पाहिजे, पण त्या पदावर आपण राहू की नाही ही शंका त्यांना सतावत आहे. कारण कॉंग्रेसमध्येच ‘राहुल हटाव, प्रियंका बिठाव’ मोहीम सुरू झाली आहे. ही मोहीम जर प्रभावी झाली तर एक दिवस आपली उचलबांगडी होणार आणि आपल्या जागी आपल्या बहिणीची प्रतिष्ठापना होणार हे त्यांना कळून चुकले आहे. यामागचे कारण म्हणजे प्रियंका गांधी यांनी अमेथी आणि रायबरेली मतदारसंघात नरेंद्र मोदींच्या विरुद्ध आक्रमक रूप धारण केले होते. तेव्हापासून राहुल गांधींचा मवाळपणा आणि प्रियंका गांधींचा आक्रमकपणा यांची पक्षात तुलना व्हायला लागली आहे. या तुलनेत मागे पडलेल्या राहुल गांधींना कॉंग्रेसमधले आपले स्थान टिकवण्यासाठी आक्रमक व्हावे लागत आहे. म्हणून त्यांनी आक्रमकतेचे दर्शन घडवले.

Leave a Comment