त्यांनाही कौशल्याची गरज आहे

activiti
आपल्या देशाची प्रगती न होण्याची अनेक कारणे आहेत. परंतु हातात कौशल्य नसताना आणि कसलेही प्रशिक्षण नसताना अनेक लोक अनेक प्रकारची कामे करत आहेत. हे प्रगती न होण्याचे सर्वात मोठे कारण आहे. आपण आपल्या आसपास नजर टाकली तर असे अनेक लोक आढळतील की ते लोक जी कामे करत आहेत. ती कामे करण्यापूर्वी त्यांनी त्या कामाचे प्रशिक्षण घेतलेले नाही. त्यामुळे ते लोक जमेल त्या पध्दतीने आणि अकार्यक्षमपणे ती कामे करत राहतात. म्हणजे अशी कौशल्याविना आणि प्रशिक्षणाविना कामे केल्याने त्या कामाच्या मागे असलेल्या कष्टाचे म्हणावे तसे ङ्गळ मिळत नाही. त्यामुळे त्यांना पैसेही चांगले मिळत नाहीत. ही गोष्ट घरात कामे करणार्‍या मोलकरणीपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांना लागू आहे. बिहार, पश्‍चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या राज्यांतून लाखो लोक गावात पोट भरत नाही म्हणून मोठ्या शहरात नोकरीसाठी येतात आणि जमेल ती कामे करत राहतात. कोणी रस्त्याच्या कडेला बसून वाहने दुरूस्त करतो तर कोणी एखाद्या कोट्यधीश व्यापार्‍याच्या घरी घरकाम किंवा स्वयंपाक करायला लागतो. काही लोक जमेल तसे शिक्षण घेऊन मोठमोठ्या वाहनांवर ड्रायव्हर म्हणून कामे करतात. अशा लोकांची कामे नीट होत नाहीत आणि त्यामुळे मालकांना त्याला ङ्गारसा पगारही द्यावा वाटत नाही. परंतु ही निकड लक्षात घेऊन दिल्लीतल्या जस्ट रोजगार डॉट कॉम या वेबसाईटवरून काम करणार्‍या एका महिलेने अशा अकुशल कामगारांना त्यांच्या कामाचे अगदी अल्पकालीन प्रशिक्षण देण्याची सोय केली. घरकामाचे गडी, मोलकरणी, स्वयंपाकी, बागकाम करणारे नोकर अशा लोकांना त्यांनी १५ दिवसांचे प्रशिक्षण दिले. मोठ्या कुटुंबात कसे वागावे याची माहिती दिली. एरवी ज्याला २ ते ३ हजार रुपयांवरसुध्दा नोकरीस ठेवण्यास कोणी तयार होत नव्हते तोच गडी आता एका मोठ्या कुटुंबात प्रशिक्षणानंतर गेला आणि तिथे त्याला ६ हजार पगार मिळाला. १५ दिवसांच्या प्रशिक्षणाचा हा ङ्गायदा. २०११ साली करण्यात आलेल्या एका पाहणीमध्ये अशा प्रकारचे ५९ लाख लोक महाराष्ट्रात आलेले आहेत. या लोकांना आपले बंगालमधले घर सोडताना महाराष्ट्रात जाऊन कोणती नोकरी मिळणार आहे हेही माहीत नसते. मग प्रशिक्षणाचा तर प्रश्‍नच नाही. अशा लोकांना निश्‍चित काम नेमून दिले आणि त्याचे प्रशिक्षण दिले तर उभयपक्षी ङ्गायदा होऊ शकतो.

Leave a Comment