अमेरिकेकडे जगभरातील ७ लाख दहशतवाद्यांची यादी

barak
अमेरिकेने जगभरातील सुमारे सात लाख जणांना दहशतवादी मानले असून त्यात प्रत्यक्ष दहशतवाद्यांशी संबंध असलेल्या तसेच अमेरिकेला दहशतवादी असल्याचा संशय असलेल्या नागरिकांचा समावेश आहे. विकिलिक्स आणि राष्ट्रीय संरक्षण संस्थेतील कल कॉन्टॅक्टर एडवर्ड स्नोडेन याच्याकडून अमेरिका जगावर कशाप्रकारे लक्ष ठेवून असते आणि चोरून मारून जगभरातील नागरिकांची माहिती कशी गोळा करत असते याचा रहस्यस्फोट झाल्यानंतर आता इंटरसेप्ट नावाच्या वेबसाईटने यात भर घालणारी ही माहिती नुकतीच प्रसिद्ध केली आहे. त्यात अमेरिकेची अनेक सरकारी गुप्त कागदपत्रे प्रसिद्ध केली गेली आहेत.

या वेबसाईटनुसार ओबामा प्रशासन काळात या यादीत मोठी भर पडली आहे. संशय व धर्मावर विसंबून केलेल्या या हेरगिरीत सात लाख नागरिकांचा समावेश आहे. ओबामा प्रशासन काळात नो फ्लाईट लिस्टमध्ये ४७ हजार जणांची नांवे आहेत या यादीत दररोज किमान ९०० नावे अथवा जादा माहिती जमा केली जात आहे. सीआयएने हायड्रा नावाचा हा गुप्त कार्यक्रम राबविला आहे आणि त्या अंतर्गत चोरून दुसर्‍या देशांचा डेटा फोडला जात आहे. अमेरिकी सरकारच्या टीएसडी म्हणजे टेररिस्ट स्क्रीनिग डेटाबेस मध्ये ६ लाख ११ हजार पुरूष तर ३९ हजार महिलांची नांवे आहेत. दहशतवादी संघटनेशी संबंध आहे किंवा तसा संशय असलेल्यांची संख्या २ लाख ८० हजार आहे. यात मिशियन राज्यातील सर्वाधिक नागरिक आहेत. या राज्यात मुस्लीमांची संख्या मोठी आहे.

नव्याने उघडकीस आलेल्या या माहितीमुळे जगातील अन्य देशांची अमेरिकेविरोधात नाराजी वाढण्याची शक्यता आहे. भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीही अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांच्याकडे अमेरिकेच्या या वागण्याबद्दल उघड नाराजी व्यक्त केली आहे.

Leave a Comment