दहिहंडी उत्सवावर डीजे चालकांचा बहिष्कार

dj
मुंबई – दहीहंडीचा उत्सव आणि डीजेचा आवाज नसेल तर काही तरी चुकल्या चुकल्या सारखे वाटणे साहजिकच आहे, कारण दहीहंडीच्या उत्सवाच्या काळात डीजेला फार महत्व आले आहे. पण यंदा ध्वनी प्रदुषणाबाबत ठाणे पोलिसांनी घेतलेल्या कडक भुमिकेमुळे डीजे चालकांनी दहिहंडी उत्सवावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याआधीच १२ वर्षाखालील मुलांना हंडी फोडण्यासाठी घालण्यात आलेली बंदी आणि आता डीजेचा बहिष्कार त्यामुळे यंदाच्या दहीहंडीवर निराशेचे सावट असणार आहे.

दहीहंडी उत्सवाचे आयोजन करणाऱ्यांवर कारवाई करणे उचित असताना केवळ सेवा देणा-या डीजे चालकांवर कारवाई करणे म्हणजे चोर सोडून संन्यासाच्या मागे लागण्यासारखे असल्याचा आरोप डीजे संघटनेने केला आहे.

गेली अनेक वर्ष उत्सवांमध्ये मोठया प्रमाणावर ध्वनी प्रदुषण होत असल्याच्या तक्रारी होत आहेत. दहिहंडीमध्येही मोठ-मोठे डीजे लावुन दहिहंडी उत्सव साजरा केला जातो. अगदी शांतता क्षेत्रातही यावेळी ध्वनी प्रदुषणाची कमाल पातळी गाठली जाते. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीप्रदुषणाच्या विरोधात काही आदेश दिले असुन हे आदेशही धाब्यावर बसवले जातात.

पण यंदा मात्र ठाणे पोलिसांनी कडक भुमिका घेतली असुन ध्वनीप्रदुषण झाल्यास आयोजकांबरोबरचं डीजे मालक आणि चालकांवर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. ठाणे जिल्हा साऊंड असोसिएशने पोलिसांच्या या निर्णयाचा निषेध केला असुन दहिहंडी उत्सवादरम्यान डीजे न पुरवण्याचा निर्णय जाहिर केला आहे. त्याचप्रमाणे मुंबईतुनही डीजे ठाण्यात येऊ दिला जाणार नाही असा इशारा दिला आहे.

Leave a Comment