वृत्तपत्र संपादकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मदत – महसूलमंत्री

balasaheb
शिर्डी : राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विकास कार्यामध्ये वृत्तपत्रांचे योगदान महत्वाचे असून वृत्तपत्रांच्या मालक-संपादकांच्या प्रश्नांवर आवश्यक तो न्याय देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करु, असे प्रतिपादन केले.

संगमनेर येथे संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र आयोजित व अमृत उद्योग समुहाच्या सहकार्याने संपादक संमेलन आयोजित करण्यात आलेच होते, त्यावेळी उद्घाटक या नात्याने ते बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ.सुधीर तांबे हे होते. संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, माहिती उपसंचालक देवेंद्र भुजबळ, ‍जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग हे उपस्थित होते.

महसूलमंत्री श्री. थोरात यांनी वृत्तपत्रांच्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले. ते म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात वृत्तपत्रांनी महत्वाची भूमिका बजावली. जगातील सर्वात महत्वाच्या पन्नास शोधापैकी मुद्रणाचा शोध पहिल्या क्रमांकावर आहे. मुद्रणशोधामुळे जगात क्रांतिकारक बदल झाले. माहिती देणे, संवाद साधणे ही कामे वृत्तपत्रांमुळे वेगाने होत असल्याने आजही वृत्तपत्रांचे महत्व अबाधित आहे. राज्यातील छोट्या वृत्तपत्रांच्या प्रश्नांची आपणांस जाण असून हे प्रश्न सोडविण्यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.

अध्यक्षीय भाषणात डॉ. तांबे यांनी राज्यातील पत्रकारितेचा गौरव केला. राज्याला लाभलेल्या गौरवशाली परंपरेचा वारसा जपण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक संमेलनाचे संयोजक किसन भाऊ हासे यांनी केले.

Leave a Comment