स्पर्धा परीक्षेत नवा विषय घेताना…

student
अनेक विद्यार्थी आपल्याला न आवडणार्‍या विषयात शिक्षण घेत असतात. तसे करताना ते आवश्यक त्या विषयांचा अभ्यास मन लावून करत नाहीत. घोकंपट्टी करून पास होतात. विशेषत: अभियांत्रिकी क्षेत्रात असे घडते. अभियांत्रिकीत कसलाही रस नसणारे कित्येक विद्यार्थी ही पदवी सुद्धा घेतात. मात्र अभियंता म्हणून कोठे नोकरी करण्यापेक्षा वेगळ्याच शाखेकडे वळावे असे त्यांना वाटते. त्यामुळे बी.ई. झालेले काही विद्यार्थी माहिती तंत्रज्ञानाकडे येतात, व्यवस्थापन शास्त्राकडे वळतात आणि त्यातले बरेच विद्यार्थी सनदी नोकरी मिळवण्या-साठीच्या स्पर्धा परीक्षेकडे मोर्चा वळवतात. त्यांना स्पर्धा परीक्षेचे विषय निवडण्याचे स्वातंत्र्य असते आणि त्यांनी अभियांत्रिकीशी संबंधित विषयच घ्यावा अशी अपेक्षा असते. परंतु काही विद्यार्थी मुळात त्याच विषयाला कंटाळलेले असतात. म्हणून ते स्पर्धा परीक्षेसाठी इतिहासासारखा अभियांत्रिकी शाखेशी संबंध नसलेला विषय निवडतात. अशा नवख्या विषयाला हात घालताना त्यांनी आधी विचार केला पाहिजे. आपला आजपर्यंतच्या शिक्षणात ज्या विषयाशी संबंध आलेला नसतो असा विषय घेऊंन आपल्या करिअरची ते जोखीम घेत असतात. आजपर्यंत आलेल्या अनुभवानुसार असे आगळेवेगळे विषय घेणारे लोक आपल्या आकलनशक्तीच्या आधारावर त्या विषयात यशस्वी झालेले आहेत. हे करताना अशा विद्यार्थ्यांनी आधी त्या विषयाचा त्या स्पर्धा परीक्षेमध्ये कोणता सिलॅबस ठेवलेला आहे हे बारकाईने पाहिले पाहिजे. सिलॅबसमध्ये जी प्रकरणे आलेली आहेत त्यांची माहिती देणारे कोणती साधने आपल्याकडे उपलब्ध आहेत याचा नंतर शोध घेतला पाहिजे. एकदा हे निश्‍चित झाले की, त्या विषयाच्या विशेषज्ञांच्या तासांना आवर्जून उपस्थित राहिले पाहिजे. त्यातून त्या विषयात कोणते प्रश्‍न येणार आहेत, त्याची पद्धत काय आहे याचे ज्ञान होऊ शकते. काही काही वेळा त्या त्या प्रकरणांशी संबंधित ट्युटोरियल्स् मिळतात, ती आवर्जून प्राप्त केली पाहिजेत. त्यातून विषयाचे आकलन वाढू शकते. अशा नव्या विषयाचा अभ्यास करताना आधी प्राथमिक अवस्थेतली माहिती देणारी पुस्तके वाचावीत आणि वरचेवर सखोल ज्ञान देणार्‍या पुस्तकाकडे जावे. म्हणजे विषय चांगला समजतो. नवा विषय घेण्यास घाबरण्याचे काही कारण नाही.

Leave a Comment