लढा ‘एबोला’ मुक्तीचा; जागतिक बँक देणार १२१८ कोटी

world-bank
वॉशिंग्टन : पश्‍चिम आफ्रिकी राष्ट्रांमधून जीवघेणा संसर्गजन्य रोग ‘एबोला’चा फैलाव जगभरात रोखण्यासाठी तसेच या रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जागतिक बँक १२१८ कोटींचा निधी देणार आहे. सिएरा लिओन येथे उगम झालेल्या रोगाचा फैलाव, गिनिया आणि लाईबेरियापर्यंत पोहोचला असून अमेरिकेतील दोन संशयित रुग्णांची चाचणी घेतली जात आहे. एबोला व्हायरसने रुग्णांची आकडेवारी ८९0वर पोहोचली.

स्वत: संसर्गजन्य आणि घातक रोगांचे तज्ज्ञ असलेले जागतिक बँकेचे अध्यक्ष डॉ. जिम योंग किम यांनी सिएरा लिओन, गिनिया आणि लाईबेरिया या तीन पश्‍चिम आफ्रिकी देशांना एबोला व्हायरसविरोधात लढण्यासाठी २0 कोटी अमेरिकी डॉलर्स निधीचे आश्‍वासन दिले. आधीच कमकुवत असलेल्या राष्ट्रांना आर्थिक मदत केल्यास त्या ठिकाणी आरोग्य सुविधांचा प्रसार होईल, अशी अपेक्षा डॉ. किम यांनी व्यक्त केली. ‘एबोला व्हायरसच्या फैलावामुळे आधीच कमकुवत आरोग्य सुविधा असलेल्या पश्‍चिम आफ्रिकी राष्ट्रांचे कंबरडे मोडले. घातक रोगावर आम्ही तासन्तास नजर ठेवून आहोत. विशेष म्हणजे एबोला रुग्णांवर उपचार करणार्‍या काही आरोग्य अधिकार्‍यांनाही संसर्ग झाल्याचे ऐकून मला अतिशय दु:ख झाले. आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्रित येऊन यावर लगेच तोडगा काढण्याची गरज आहे,’ असे किम यांनी सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेच्या अध्यक्षा डॉ. मार्गारेट चॅन यांनी वर्ल्ड बँकेच्या निर्णयाचे स्वागत केले.

Leave a Comment