महायुतीतील घटक पक्षांना हव्यात ८३ जागा

raju-shetty
पुणे : आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आघाडी पाठोपाठ आता महायुतीत ही जागावाटपावरून चांगलाच कलगीतुरा रंगणार असल्याचे चित्र निर्माण होत आहे. या दरम्यान राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाने पुण्यात झालेल्या बैठकीनंतर ३८ जागांची मागणी केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम या महायुतीचे घटक पक्ष असलेल्या नेत्यांची पुण्यात झालेल्या बैठकीनंतर आगामी विधानसभेसाठी त्यांनी जागांची मागणी केली.

अद्याप शिवसेना आणि भाजप यांच्यात जागावाटपाबाबत एकवाक्यता झालेली नाही आणि त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ३८ जागा, राष्ट्रीय समाज पक्षाने ३० तर शिवसंग्राम पक्षाने १५ जागांची मागणी केल्यामुळे दोघांच्या जागावाटपाआधीच महायुतीतील तिढा वाढण्याची शक्यता आहे.

तरी यावर स्वाभिमानी शेतकरी संघटना अडून बसणार नसल्याचेही राजू शेट्टी यांनी दरम्यान स्पष्ट केले. यासोबतच आमच्यातील समन्वयानंतर योग्य तो निर्णय घेऊन प्रमुख पक्षांच्या श्रेष्ठींपर्यंत पोहोचवू असेही राजू शेट्टी यांनी सांगितले.

विधानसभेसाठी एकूण 288 जागा असून शिवसेनेने त्यापैकी १६९ जागांची मागणी केली आहे. पण भाजपला हे मान्य नाही. त्यामुळे आता या घटक पक्षांना किती जागा देणार हा प्रश्नच आहे. या तिघांनी मिळून केलेल्या जागांची संख्या ८३ होते आहे. त्यात अजूनपर्यंत रामदास आठवले यांच्या आरपीआयचा समावेश झालेला नाही.

Leave a Comment