दापोलीतील धोकादायक गावांची पाहणी; पण …

maalin
दापोली : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात माळीण गावावर दरड कोसळण्याची घटना घडल्याच्या पार्श्‍वभूमीवर महसूल विभागाकडून तालुक्यातील दरडी कोसळण्याची पार्श्‍वभूमी व शक्यता असलेल्या डेंजर झोनमधील गावांची पाहणी करण्यात आली. तालुक्यातील कर्दे येथील तेलीवाडी व बौद्धवाडीपासून २00 मीटर लांब असलेल्या डोंगराला सन २0१0मध्ये मोठी भेग पडली होती. या प्रकारामुळे येथे घबराट पसरली होती. या भेगेची पाहणी महसूल विभागाकडून करण्यात आली. या वेळी ही भेग डोंगरावरून पाण्याबरोबर वाहत आलेल्या मातीने भरल्याचे निदर्शनास आले. मात्र अतिवृष्टी झाल्यास येथे धोका उद्भवण्याची शक्यता महसूल विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महसूल विभागाकडून यापूर्वीच मुरुड व कर्दे येथील ११९ तर हर्णै व पाजपंढरी येथील ८९ कुटुंबीयांना स्थलांतराच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मात्र ग्रामस्थ अन्यत्र स्थलांतर करण्यास राजी नसल्यामुळे धोक्याची टांगती तलवार कायम राहिल्याची स्थिती आहे.

Leave a Comment