चला टोपी बदलू या

gandhi-topi
आाता राजकारणातून टोपी बाद झाली आहे. टोपीच काय पण खादीही हद्दपार होत आहे. नाहीतर निरनिराळ्या रंगांच्या गांधी टोप्या राजकारणात फार लोकप्रिय होत्या. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना पूर्वी पांढरी गोधी टोपी परिधान करणे सक्तीचे होतेच पण ती खादीची असावी असाही नियम होता. आपण जिला गांधी टोपी म्हणतो ती स्वत: गांधीजींनी तरुण वयात वापरली होती पण त्यांनी अंगात कपडे न घालता केवळ एका पंचावरच रहायचा निर्धार केला तेव्हा पासून टोपीही घालणे बंद केले पण ती टोपी गांधी टोपी म्हणून नावाजली गेली. नंतर कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पांढरी, समाजवाद्यांची लाल टोपी आणि रिपब्लिकन पार्टीची निळी टोपी चर्चेत राहिली. त्या त्या पक्षाचे कार्यकर्ते नेहमी या टोप्या वापरत नाहीत पण एखाद्या सभेत अचानकपणे या टोप्या घालून येतात. आता हाही प्रकार कमी झाला आहे. पण तरीही एखादा कार्यकर्ता पक्ष बदलतो तेव्हा त्याला टोपी बदलणे असे म्हणतात. टोपी राजकारणातून बाद झाली पण टोपी बदलणे हा शब्द राजकारणात कायम झाला. आता महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होईल अशी स्थिती आली असतानाच महाराष्ट्रात टोप्या फिरवणार्‍यांची एकच घाई सुरू झाली आहे. अनेक जणांनी संभाव्य सत्ताधारी पक्षांत उड्या मारायला सुरूवात केली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत मोदी लाटेत भाजपा-सेना महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले.त्यामुळे आताही तसेच यश मिळून राज्यात युतीची सत्ता येईल असे गृहित धरून अनेकांनी त्या संभाव्य सत्ताधारी राहुटीत आश्रय घ्यायला सुरूवात केली आहे. युतीला चक्क ४२ जागा मिळाल्या.

कॉंग्रेसला मात्र आता विधानसभेच्या निवडणुकीत ती मोदी लाट टिकणार नाही असे वाटते. या निवडणुका वेगळ्या वातावरणात होतील अशी आशा कॉंग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे. लोकसभेच्या निवडणुकीतली लाट विधानसभेत टिकत नाही ही गोष्ट उत्तरांचलात दिसून आली आहे. तिथे झालेल्या विधानसभेच्या तीन पोटनिवडणुकांत भाजपाचे उमेदवार पराभूत झाले असून कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. या निकालातून मोदी लाट संपली असल्याचा निष्कर्ष काढलाा जात असला तरीही त्या बाबत एकाही कॉंग्रेस नेत्याने काही म्हटलेले नाही. लाट ओसरल्याचे निष्कर्ष पत्रकारांनी काढले आहेत. कॉंग्रेसच्या नेत्यांना तसे म्हणणे सोयीचे नाही कारण या पोटनिवडणुकांत राहुल आणि सोनिया गांधी यापैकी कोणीही प्रचाराला गेले नव्हते. तेव्हा लाटेचा काही निष्कर्ष काढायचा प्रयत्न केला तर, तिथे गांधी घराण्यातले कोणीच प्रचाराला गेले नाही म्हणून कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले असे विश्‍लेषण केले जाईल अशी भीती कॉंग्रेसच्या नेत्यांनाच वाटते.

असे असले तरीही महाराष्ट्रात आता लाटेची चर्चा सुरू आहे. एक गोष्ट मान्य करावी लागेल की लोकसभेच्या निवडणुकीचे वातावरण राहिलेले नाही. पण हे मान्य करतानाच काही कार्यकर्ते असे म्हणत आहेत की वातावरण वेगळे आहे, ते कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीसाठी त्यापेक्षा वाईट आहे. कॉंग्रेसमधलं वाद आणि गोंधळ यामुळे मोदी लाट आली होती पण महाराष्ट्रात गेल्या दोन महिन्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीतला गोंंधळ अधिक वाढला आहे. तेव्हा विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा त्यापेक्षा दारुण पराभव होणार आहे. अशा वातावरणाचा वास तळागाळातल्या कार्यकर्त्यांना लवकर येतो की काय हे माहीत नाही पण राज्यात सर्वत्र त्यांना कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या पराभवाची चाहूल लागली असून आता आपल्याला सत्ताधारी पक्षाच्या सोबत रहावे लागेल याची जाणीव झाली आहे. असे कित्येक कार्यकर्ते कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा त्याग करून भाजपा किंवा शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. प. महाराष्ट्रात असे अनेक कार्यकर्ते प्रामुख्याने शिवसेनेत येत असून मराठवाडा-विदर्भात त्यांचा ओढा भाजपाकडे आहे. या कार्यकत्यार्ंंना आपल्यात सामावून घेताना या दोन्ही पक्षांचे नेते त्यांना पारखून घेत आहेत. कालच कोकणातले राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. छगन भुजबळांच्या काही निकटवर्तियांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपाने आयाराम गयारामांना जवळ घेताना त्यांच्या पार्श्‍वभूमीचा विचार केला जाईल असे म्हटले आहे पण शिवसेनेत त्याबाबत फार दक्षता घेतली जात नाही असे दिसते.

या दोन्ही पक्षांनी काहीही म्हटले असले तरीही या पक्षांतरात ते करणारा आणि त्याला प्रवेेश देणारा अशा दोघांनाही काही राजकीय सोयीचा विचार करावा लागत आहे. काही गावातले असे अन्य पक्षात जायला उत्सुक असलेले कार्यकर्ते आपला मतदारसंघ महायुतीच्या जागा वाटपात शिवसेनेकडे जातो की भाजपाकडे जातो याचा विचार करीत असतात. विधानसभेच्या जागावाटपात गेल्या पंचवीस वर्षात शिवसेनेकडे जास्त म्हणजे १७१ जागा जातात तर भाजपाकडे ११७ जागाअसतात. त्यामुळे १७१ मतदारसंघातल्या नवा घरोबा करणार्‍या नेत्यांचा कल शिवसेनेकडे अधिक असतो. त्यामानाने भाजपाला जवळ करणारे नेते ११७ मतदारसंघातच दिसतात. परिणामी शिवसेनेकडे जास्त आवक आहे. शिवसेनेचे नेते कोणालाही आत घेताना त्याची निवडून येण्याची क्षमता पहात असतात. त्याची जात, त्याच्या मतदारसंघातली जातीय समीकरणे, त्याची पैसा कमावण्याची क्षमता त्याचबरोबर निवडणूक प्रचार यंत्रणा राबवण्याची ताकद, मते फोडण्याचे कसब या गोष्टी आता प्रवेश देताना महत्त्वाच्या ठरत असतात. बाकी गोष्टी गौण मानल्या जातात. त्या गौण गोष्टीत पक्षाविषयीची निष्ठाही असते. ती नसली तरीही बहुमताचे गणित सोडवण्यास मदत होईल म्हणजेच निवडून येईल असा उमेदवार आत घेतला जात आहे. खर्‍या निष्ठावंतांवर अन्याय होतो ही गोष्ट खरी पण राजकारणात त्याला महत्त्व नसते.

Leave a Comment