लुधियानातील सायकल उद्योगाला चीनी मालाचे आव्हान

ludhiyana
जगात सायकली आणि सायकलींचे सुटे भाग उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या पंजाबमधील लुधियानाला सध्या मंदीचे चटके सहन करावे लागत आहेत. यामागे सायकलींचा कमी झालेला खप हे कारण नाही तर चीनमधून आयात होत असलेले स्वस्त सुटे भाग आणि सरकारची चुकीची धोरणे कारणीभूत आहेत.

गेल्या पाच वर्षात चीनमधून होत असलेल्या सुट्या भागांची आयात ४१ टक्के वाढली आहे व याचा फटका लुधियानातील उद्योगांना बसत आहे. भारतात सायकल च्या सुट्या भाग उत्पादनापैकी ८० टक्के उत्पादन लुधियानात होते व १५ टक्के सायकल उत्पादन होते. यापूर्वी सायकली आयात करण्याचे प्रमाण मोठे होते मात्र आता सायकलींचे उत्पादनही लक्षणीय वाढले आहे. चीननंतर सायकल उत्पादनात भारताचा नंबर आहे. १.५ अब्ज उलाढाल असलेल्या या उद्योगात दरवर्षी दीड कोटी सायकली तयार होतात. म्हणजे ४१ हजार सायकलींचे रोज उत्पादन होते. त्यात हिरो आणि अॅव्हॉन ब्रँड आघाडीवर आहेत.

सायकल उत्पादकांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारने अँटी डंपिग कायदा लागू करायला हवा. चीनमधून आयात होत असलेल्या स्वस्त मालावर हा कायदा लागू व्हावा. तसेच वीजटंचाई, बँकांचे चढे कर्जव्याजदर, कच्चा माल वाहतूक दरातील वाढ आणि ५.५ टक्के वॅटमुळे हे उत्पादक अडचणीत आले आहेत. या सर्वांवर योग्य मार्ग काढला गेला तरच हा उद्योग टिकेल अन्यथा उद्योजक कर्जबाजारी होतील अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment