दुकानदाराला विकलेला माल परत घेणे बंधनकारक

shopping
मुंबई – आपण फार हौशीने एखाद्या दुकानात सामान खरेदी करतो पण त्या मालात काही डिफेकट आला किंवा आपल्याला पसंत नसल्यास काही दुकानदार ते सामान बदलून देण्यास किंवा बदलून देण्यास टाळाटाळ करतात. पण आता अशाच दुकानदारांना ग्राहक न्यायालयाने चपराक लगावली असून महाराष्ट्र ग्राहक तक्रार निवारण आयोगाने विकलेले किंवा डिफेकटीव्ह सामान परत घेण्याचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्र ग्राहक तक्रार निवारण आयोगाने विकलेले किंवा डिफेकटीव्ह सामान बदलून न देणे किंवा परत न घेणे कायद्याच्या चौकटीत बसत नसून हे सर्व बेकायदेशीर असल्याचा निकाल दिला आहे.

मुंबईतील कॅम्पसमध्ये राहणाऱ्या प्रेम तुकाराम लोके यांनी अशाच एका संदर्भात दाखल केलेल्या तक्रारीनंतर त्यांचे अपील राज्य आयोगाचे अध्यक्ष न्या. आर. सी. चव्हाण, सदस्य धनराज खामतकर यांनी मंजूर केले आहे व लोके यांना त्यांनी परत केलेल्या मालाची संपूर्ण रक्कम व एक हजार रुपये भरपाई चार आठवड्यात देण्याचे आदेश पवई येथील महाराष्ट्र फॅमिली शोरूमचे मालक नरपत एस. पुरोहित यांना दिले आहेत. ठरलेली रक्कम व नुकसान भरपाई देण्यास विलंब केल्यास पुरोहित यांना त्यावर ९ टक्के व्याज दराने भरपाई करावी लागेल.

गतवर्षी ऑगस्टमध्ये महाराष्ट्र फॅमिली शोरूममधून दोन पँट आणि दोन शर्ट खरेदी केले होते. १० टक्के सूट वजा करून लोके यांनी या कपड्यांसाठी एकूण ३,०५० रुपये दिले. दुसर्‍या दिवशी लोके कपडे बदलून घेण्यासाठी पुन्हा त्या दुकानात गेले. पण, दुकानदाराने बदली म्हणून दाखवलेल्या कपड्यांच्या दर्जाने समाधान न झाल्याने त्यांनी पैसे परत करण्याची मागणी केली; परंतु दुकानदार पुरोहित यांनी पैसे देण्यास नकार दिला होता.
या दरम्यान राज्य आयोगाकडे अपील केल्यावर लोके यांनी केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे एक पत्र निदर्शनास आणले. ‘एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही किंवा बदलूनही दिला जाणार नाही’, अशी अट दुकानदारांनी त्यांच्या पावतीवर अथवा बिलावर छापण्यास बंदी आहे.

राज्य आयोगाने लोके यांच्या अपिलावर नोटीस काढताच दुकानदार पुरोहित वकिलासह हजर झाले व त्यांनी लोके यांना सर्व पैसे परत करण्याची स्वत:हून तयारी दर्शविली. आयोगाने त्याखेरीज एक हजार रुपये भरपाई देण्याचाही आदेश दुकानदारास दिला.

Leave a Comment