अजंठा लेण्यांनाही दरडी कोसळण्याचा धोका

ajantha
औरंगाबाद – जगप्रसिद्ध अजंठा लेण्यांतही कांही जागी दरडी कोसळण्याचा धोका असून संबंधित भाग पुरातत्त्त विभागाने सध्यापुरते दोरखंड लावून बंद केले आहेत. या भागात जाऊ नये अशा सूचना पर्यटकांना दिल्या जात आहेत.

पुण्याजवळ भीमाशंकरच्या डोंगरातील माळीण गावावर दरड कोसळून १३० पेक्षा अधिक गावकरी मृत्यूमुखी पडल्याची घटना ताजी असतानाच अंजठ्यातही कांही ठिकाणी गेले काही दिवस दगड कोसळत असल्याचे लक्षात आले आहे. जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळालेल्या या लेण्यांना जगभरातील पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात. सध्या पावसाळा सुरू असला तरी पर्यटकांची गर्दी वाढतीच आहे. या भागातही माळीण सारखी दुर्घटना घडण्याची भीती असल्याने पर्यटकांनी कांही भागात जाऊ नये अशा सूचना पुरातत्त्व विभागाकडून सातत्याने दिल्या जात असल्याचे समजते.

बेसाल्ट खडकांत ही लेणी आहेत. आजपर्यंत भूकंप, पाऊस यामुळे या लेण्यांना कधीही धोका पोहोचला नव्हता. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कांही भागात दगड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. पावसाच्या दिवसांत दरडी कोसळण्याचे प्रमाण अधिक असते. पर्यटकांना कोणताही धोका होऊ नये यासाठी सावधगिरी म्हणून कांही भागात जाऊ नये अशा सूचना दिल्या जात असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment